प्रभाग ५ आणि ६ , दोन प्रभागात दोन दिग्गजांची लढत

0
480

महिला वार्डातही मोठी चुरस

युवावार्ता (प्रतिनिधी)
आज शुक्रवारी संगमनेर परिषदेसाठी माघारीचा शेवटचा दिवस आहे. या माघारीनंतर संपूर्ण शहराचे चित्र स्पष्ट होणार असले तरी प्रभाग क्रमांक पाच आणि सहा हा प्रचंड चर्चेचा प्रभाग ठरत आहे. पाच ब मधून माजी नगराध्यक्ष व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वासराव मुर्तडक यांचा थेट मुकाबला यावेळी महायुतीचे रवींद्र देवराम म्हस्के यांच्याशी होणार आहे. तर या स्पर्धेत अपक्ष म्हणून माजी नगरसेवक संजय मंडलिक देखील रिंगणात आहे. त्याचबरोबर प्रभाग पाच अ मध्ये महिलांमध्ये ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या डॉ. अनुराधा निलेश सातपुते आणि शिवसेनेचे उमेदवार संगीता भारत गवळी यांची थेट लढत होणार आहे. त्यामुळे अतिशय रोमहर्षक लढती या प्रभागात होत होत आहे. प्रभाग सहा ब मध्ये देखील माजी नगरसेवक गजेंद्र बजाबा अभंग यांना महायुतीचे राहुल नंदकुमार भोईर हे टक्कर देत आहे. त्याचबरोबर प्रभाग 6 अ मध्ये ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाकडून वनिता संजय गाडे या मैदानात असून त्यांना महायुतीच्या शोभा सुनील घुले या टक्कर देत देत आहे. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसने देखील येथे आपला उमेदवार दिल्याने आणि अपक्ष म्हणून कांचन शंकर मुर्तडक यांची उमेदवारी देखील लक्ष वेधून घेत आहे.


प्रभाग क्रमांक- 5
लोकसंख्या एकूण – 4169
अ.जा.- 186
अ.ज.- 96
व्याप्ती – जनतानगर, चैतन्यनगर, मार्केट यार्ड परीसर
उत्तर – स्वयंवर मंगल कार्यालय अकोले बायपास ते तुषार प्राईड इमारत कॉर्नर ते पद्मरसिक शाह विद्या मंदिराचा नैऋत्य कॉर्नर ते आंबरे पाटील कन्या विद्यालय ते श्रीराम सुपर शॉपी ते निलेश मोटर्स, नाशिक पुणे हायवे पर्यंत.
पूर्व – निलेश मोटर्स, नाशिक पुणे हायवे ते हॉटेल सरस्वती (जय जवान चौक), नाशिक पुणे हायवे पर्यंत.
दक्षिण – हॉटेल सरस्वती (जय जवान चौक), नाशिक पुणे हायवे ते मिलिंद कानवडे इमारत वायव्य कॉर्नर ते कॉर्नर किराणा व मोबाईल शॉपी ते ताम्हाणे हॉस्पिटल ते राजयोग स्वीट्स, अकोले बायपास पर्यंत.
पश्चिम – राजयोग स्वीट्स, अकोले बायपास रोड ते हॉटेल सुप्रीम बार कॉर्नर ते स्वयंवर मंगल कार्यालय, अकोले बायपास पर्यंत.
प्रभाग क्रमांक- 6
लोकसंख्या एकूण-4124
अ.जा.- 381
अ.ज.- 158
व्याप्ती – इंदिरानगर, सह्याद्री विद्यालय, सा. बां. विभाग शासकीय विश्राम गृह.
उत्तर – राजयोग स्वीट्स, अकोले बायपास ते ताम्हाणे हॉस्पिटल ते कॉर्नर किराणा व मोबाईल शॉपी ते मिलिंद कानवडे इमारत वायव्य कॉर्नर ते सरस्वती हॉटेल (जय जवान चौक), नाशिक पुणे हायवे पर्यंत.
पूर्व – सरस्वती हॉटेल, जय जवान चौक, नाशिक पुणे हायवे ते पीडब्ल्यूडी गेस्ट हाउस आग्नेय कॉर्नर, नाशिक पुणे हायवे पर्यंत.
दक्षिण – पीडब्ल्यूडी गेस्ट हाउस आग्नेय कॉर्नर, नाशिक पुणे हायवे पासून ते अकोले बायपास रोडने पेटीट कॉलेज सर्कल पर्यंत. अशी प्रभाग रचना आहे.
दरम्यान शहरातील हे दोन्ही प्रभाग छोटे असले तरी या ठिकाणी दाट लोक वस्ती आणि सर्व समाज घटकांचा एकत्रित मिलाप या ठिकाणी दिसून येतो. इंदिरानगर येथे अतिशय दाट लोकवस्ती व कष्टकरी जनता त्याचबरोबर चैतन्य नगर जनता नगर व आजूबाजूच्या परिसर हा मध्यमवर्गीय उच्चवर्गीय समाज असल्याने तसेच सर्व जातीसमूहांचा यात समावेश आहे. सर्व पक्षांना मानणारा देखील येथे मोठा वर्ग आहे.

दरम्यान प्रभाग पाच ब मध्ये आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाकडून पुन्हा एकदा विश्वास मुर्तडक यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली आहे. त्यांचा या प्रभागात सातत्याने असलेल्या दांडगा जनसंपर्क, नगराध्यक्ष व नगरसेवक म्हणून केलेले उल्लेखनीय काम ही त्यांची मोठी जमेची बाजू आहे. भव्य उद्यान, स्वच्छतागृह, चांगले रस्ते, वृक्षारोपण, विविध सामाजिक उपक्रम याद्वारे ते सातत्याने जनतेमध्ये मिसळत असतात. त्याचबरोबर नगरपालिकेच्या रामकृष्ण सभागृहात सत्ताधार्‍यांचा आवाज देखील कायम ते बुलंद ठेवतात. त्यामुळेच पक्षाने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. मात्र यावेळी त्यांना महायुतीकडून जोरदार आव्हान उभे करण्यात आले आहे. शिवसेनेचे उमेदवार रवींद्र म्हस्के यांनी या प्रभागात अल्पावधीतच आपला चांगला जम बसवला आहे. तरुणांचे मोठे संघटन दांडगा जनसंपर्क आणि लढाऊ वृत्ती यामुळे त्यांची उमेदवारी या ठिकाणी लक्ष वेधून घेत आहे. येथील नाराज घटकांचा देखील त्यांना पाठिंबा मिळताना दिसत आहे. अतिशय अटीतटीची रंगत या प्रभाग पाच ब मध्ये होण्याची शक्यता आहे.
प्रभाग पाच अ हा महिलांसाठी राखीव असल्याने येथून ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक करून डॉक्टर निलेश सातपुते यांच्या पत्नी डॉ. अनुराधा सातपुते यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे सातपुते परिवार या ठिकाणी सर्वांना परिचित असा आहे सामाजिक क्षेत्रात देखील या परिवाराचे योगदान आहे. त्याचा फायदा सोबतच पक्षाची पाठबळ पाठीशी असल्याने डॉ. अनुराधा सातपुते यांना मोठे बळ मिळणार आहे तर दुसरीकडे ओबीसी नेतृत्व असणारे भारत गवळी यांच्या पत्नी संगीता गवळी यांना महायुतीने मोठी ताकद देऊन मैदानात उतरवले आहे. भारत गवळी यांचा देखील या ठिकाणी मोठा जनसंपर्क आणि लढावू वृत्तीने काम यामुळे त्यांचा देखील प्रभाव लक्ष वेधून घेत आहे.

प्रभाग क्रमांक सहा ब हा इंदिरानगर व परिसराचा असणारा प्रभाग आहे. याच प्रभागात आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मैथिली तांबे यांचे निवासस्थान आहे. त्यामुळे त्यांचा प्रभाव या परिसरावर आहे. येथून माजी नगरसेवक गजेंद्र अभंग पुन्हा मैदानात आहेत. सर्वांच्या मदतीला धावून जाणारे, सातत्याने जनमानसात मिसळणारे, मृदुभाषी असा स्वभाव असणारे गजेंद्र अभंग हे गेल्या अनेक वर्ष या प्रभागाचे नेतृत्व करत आहे. यावेळी देखील पक्ष नेतृत्वाने त्यांना संधी दिल्याने त्यांचा जोरदार प्रचार सुरू झाला आहे. तर विरोधात महायुतीच्या वतीने युवा कार्यकर्ते आणि आमदार अमोल खताळ यांचे निष्ठावंत राहुल भोईर त्यांना जोरदार टक्कर देत आहे. अल्पावधीतच राहुल भोईर यांनी देखील या प्रभागात आपला जम बसवला आहे. या प्रभागात जनता काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सहा अ मधून या परिसरातील युवा नेते संजय गाडे यांच्या पत्नी वनिता गाडे या ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाकडून जोरदारपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. संजय गाडे यांचा सर्वपक्षीय कार्यकर्त्याशी असलेला स्नेह, लढाऊ वृत्ती, आक्रमक भूमिका घेणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. खरे तर तेच या निवडणुकीत उमेदवारी करणार होते. परंतु अंतर्गत समझोतामुळे या ठिकाणी त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली. मागील निवडणुकीत देखील त्यांनी या प्रभागातून लक्षवेधी मते घेतली होती. त्यानंतर मतदारांशी ठेवलेला सातत्याने संपर्क स्नेह व विविध सामाजिक राजकीय सांस्कृतिक उपक्रमाच्या माध्यमातून केलेले काम या बळावर पुन्हा एकदा ते मैदानात आहेत. तर त्यांच्या विरोधात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे दोघेजण लढा देत आहे. महायुतीत समझोता न झाल्याने हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढत असल्याने त्याचा देखील मोठा फटका महायुतीला बसून ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचा त्याचा फायदा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर अपक्ष कांचन मुर्तडक या सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार असून त्यांचा देखील या ठिकाणी चांगला संपर्क आहे. अशा या दुरंगी किंवा तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे 3 डिसेंबर रोजी ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here