आ. सत्यजित तांबे यांची महसूलमंत्र्यांसोबत पुन्हा बैठक

0
2115

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- संगमनेर शहरातील इंदिरानगर, शिवाजीनगर परिसरातील रहिवाशांना त्यांच्या घरांचे मालकी हक्क मिळवून देण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी मंगळवारी (5 ऑगस्ट) पुन्हा एकदा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. मंत्री बावनकुळे यांनी यासंदर्भात तात्काळ संबंधितांना निर्देश दिले आहेत.
या भेटीत आमदार तांबे यांनी, संगमनेर बुद्रुक येथील सर्वेक्षण क्रमांक 104, 105, 106 (442) आणि 219 मधील ‘पोकळीस्त’ आणि इतर हक्कांच्या नोंदी रद्द करून, प्रत्यक्ष रहिवाशांच्या नावावर सात-बारा (7/12) आणि सिटी सर्व्हे अभिलेखात नोंद करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना देण्याची विनंती करत व या भागातील नागरिकांना भेडसावणार्‍या समस्यांकडे लक्ष वेधले.

या महत्त्वपूर्ण मागणीवर मंत्री बावनकुळे यांनी तातडीने कार्यवाही केली. त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना फोन करून या प्रकरणी त्वरित पुढील पावले उचलण्याचे निर्देश दिले. या तात्काळ प्रतिसादाबद्दल आमदार सत्यजित तांबे यांनी महसूल मंत्र्यांचे आभार मानले आहेत.
यापूर्वी, 30 जुलै रोजी देखील महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार तांबे यांच्या उपस्थितीत या विषयावर एक बैठक पार पडली होती. त्यावेळी सर्वेक्षण क्रमांक 106 (442) मधील नागरिकांच्या प्रश्‍नांवर चर्चा झाली होती. आता, आमदार तांबे यांच्या पाठपुराव्यामुळे या बैठकीचा विस्तार इतर संबंधित सर्वेक्षणांपर्यंत करण्यात आला आहे. या निर्णयामुळे संगमनेरमधील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्‍नावर तोडगा निघण्याची शक्यता वाढली असून, हजारो रहिवाशांना त्यांच्या हक्काची जमीन मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here