गोंधळलेले गठबंधन ! तांबे-थोरात संघर्ष की सहकार्य ?

युवावार्ता (प्रतिनिधी)-
संगमनेर – गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर मूर्त स्वरूप मिळणार असल्याचे स्पष्ट झाले असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेची तयारी सुरू केली आहे. मात्र या निवडणुका ठरल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यासह संगमनेर तालुक्यातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आघाड्या, युती आणि नेत्यांच्या अनिश्चित भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, हे निवडणूक रणांगण भलतेच रंगतदार ठरणार आहे.
सत्ताधारी महायुतीत अंतर्गत कलह उफाळला
राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट असूनही प्रत्येक पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. काही ठिकाणी जागा वाटपावरून मतभेद उफाळले आहेत. त्यामुळे महायुतीचा एकत्रित लढा संपूर्ण राज्यात शक्य होईल का, याबाबत शंका निर्माण झाली आहे.
विरोधी महाआघाडीही गोंधळलेल्या स्थितीत
विरोधी महाआघाडीमध्येही समन्वयाचा अभाव स्पष्ट दिसतो आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मनसे यांच्यातील मैत्री चर्चेत आहे; पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची भूमिका अनिश्चित आहे. त्यामुळे महाआघाडी एकसंधपणे लढेल की नाही, यावरही प्रश्नचिन्ह आहे.
संगमनेरात शिवसेनेचा उगम, काँग्रेसचा गड डळमळीत
संगमनेर तालुक्यात गेल्या काही महिन्यांतील राजकीय घडामोडी लक्षवेधी ठरल्या आहेत. आ. अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (शिंदे गट) ने तालुक्यात आपली ताकद वाढवली असून, पारंपरिक काँग्रेस आणि भाजप दोघांनाही आव्हान उभे केले आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर संगमनेरातील काँग्रेस पक्ष ढासळल्याचे चित्र आहे. नेते आणि कार्यकर्त्यांचे एकएक करून पक्षांतर सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण झाला आहे.
सत्यजित तांबे यांची भूमिका चर्चेचा विषय
विधानपरिषद आ.सत्यजित तांबे यांची भूमिका अधिकच गूढ बनली आहे. काँग्रेसच्या पारंपरिक नेतृत्वाशी जवळीक असतानाही ते भाजपच्या नेत्यांची उघड प्रशंसा करत आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह तर भाजपमध्ये संभाव्य विसंवाद निर्माण झाला आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे असलेले सत्यजित तांबे यांचे कार्यकर्ते शारीरिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये, मानसिकदृष्ट्या तांबेंच्या पाठिशी आणि व्यवहारात भाजपच्या फायद्यासाठी काम करत असल्याचा आरोप होतो आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होत आहेत.
नेत्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार अमोल खताळ, आमदार सत्यजित तांबे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या भूमिकांवरच निवडणुकीची रंगत अवलंबून राहणार आहे. हे नेते कोणत्या बाजूने झुकतात, कोणासोबत राहतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
मतदारांच्या अपेक्षा वाढल्या, कार्यकर्ते संभ्रमात
या संपूर्ण घडामोडींमुळे सर्वसामान्य मतदारांची अपेक्षा अधिकच वाढली आहे. त्यांना ठोस विकास, पारदर्शक कारभार आणि मजबूत नेतृत्व हवे आहे. मात्र पक्षीय गोंधळामुळे मतदारही संभ्रमात सापडला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे एक मोठा राजकीय प्रयोग ठरणार असून, यातून कोणते नवे समीकरण तयार होते, कोण विजयी ठरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. संगमनेरचे राजकारण केवळ तालुक्यापुरते मर्यादित न राहता, जिल्ह्यातील राजकीय दिशादर्शक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.