माजी नगरसेवक डॉ. दानिश खान यांनी प्रशासनाला आणली जाग

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – गेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या संगमनेर नगर परिषदेतील विकासकामे ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक डॉ. दानिश खान यांनी लखमीपुरा भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात अनोख्या ‘गांधीगिरी’ आंदोलनातून प्रशासनाचे लक्ष वेधले.
डॉ. खान यांनी गुरुवारी रस्त्यावरच्या खोल खड्ड्यांमध्ये गुलाबाची रोपे लावून निष्क्रिय प्रशासनाला चिमटे काढले. या अभिनव आंदोलनाला प्रभागातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे रखडलेल्या विकासकामांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

चार वर्षांपासून प्रलंबित रस्ता लखमीपुरा भागातील रस्ता सुमारे चार वर्षांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आला होता. परंतु अद्याप प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. या रस्त्यावरून शाळकरी मुले, रुग्णालयात जाणारे रुग्ण व बाजारात ये-जा करणार्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासकीय उदासीनतेवर नागरिकांचा रोष कौन्सिलचा कालावधी संपल्याने नगर परिषदेच्या निवडणुका चार वर्षांपासून झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रशासकीय राजवट लागू असून विकासकामे रखडली आहेत. नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. प्रशासन केवळ वेळ मारून नेत आहे आणि त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे, असा सूर नागरिकांमध्ये उमटतो आहे.
या आंदोलनावेळी बोलताना डॉ. दानिश खान म्हणाले, जनतेच्या सोयीसाठी हा रस्ता तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे. श्रेय कोणीही घेऊ द्या, पण नागरिकांचे हाल होऊ नयेत. जर प्रशासनाने तातडीने काम सुरू केले नाही, तर आम्हाला यापेक्षा मोठे आंदोलन करावे लागेल.