नाशिक–पुणे महामार्गावर नागरिकांना धमकावण्याचा प्रकार

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- शहरातील नाशिक पुणे महामार्गावर हातात कोयता घेवून स्थानिकांना धमकावून दहशत निर्माण करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, गुरुवारी (दि. 8) सायंकाळी सांत्र वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांच्या पथकाने या तिघांना राणताराजा मैदानात पकडत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की पोहेकॉ. सातपूत, हासे, पोकी. पांडे, राठोड, क्षीरसागर, नागरे, खुळे असे पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना जाणता नाशिक पुणे महामार्गावर एका हॉटेल समोर हातात कोयता घेवून स्थानिक नागरिकांना धमकावून दहशत निर्माण करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरुन त्यांनी पथकातील सातपुते यांना सदर ठिकाणी जावून कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथक त्यांच्या मागावर गेले असता जाणता राजा मैदानात समीर ज्ञानेश्वर सोनवणे (वय 24, रा. वेल्हाळे, ता. संगमनेर), सुदर्शन संजय नवले (वय 24, रा. मालदाड, ता. संगमनेर) व यश दत्तू सोनवणे (वय 18, रा. वेल्हाळे, ता. संगमनेर) हे तिघे मिळून आले, तर समीरच्या हातात एक लोखंडी कोयता दिसला. याबाबत पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता हा कोयता स्वतःचा असून, कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. याप्रकरणी पो. कॉ. रामकिसन मुकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील तिघांवर शहर पोलिसांनी भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करत कोयता जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

















