संगमनेरमध्ये कोयत्याच्या धाकाने खंडणी वसूल

0
191

10 हजार रुपये व चांदीची चैन हिसकावली

संगमनेर (प्रतिनिधी)- शहरात अलीकडेच चोरी, खंडणी व लुटमारीसारख्या गुन्ह्यांत वाढ होत असल्याची चर्चा रंगत असतानाच संगमनेर पोलिसांनी धडक कारवाई करत तिघा गुन्हेगारांना अवघ्या दोन तासांत जेरबंद केले आहे. कोयत्याचा धाक दाखवत 10 हजार रुपये रोख व 25 ग्रॅम वजनाची चांदीची चैन हिसकावल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

संगमनेर शहर पोलिस स्टेशन गुन्हा क्र. 821/2025 भारतीय न्याय संहिता कलम 310(2), 115(2), 352, 351(2) व भारतीय शस्त्र अधिनियम 4/25 अन्वये फिर्याद नोंदविण्यात आली. फिर्यादी शिरीष अनंत शहाणे (रा. पावबाकी रोड, संगमनेर) हे श्रीरामनगर येथील बालाजी ॲटो गॅरेजमध्ये असताना आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून धमकी दिली व पैसे तसेच चैन हिसकावून नेली.

घटनेनंतर पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, पो.उपनिरीक्षक इम्रान खान व विशेष गुन्हे शोध पथकाने शोधमोहीम हाती घेतली. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत आरोपी धीरज राजेंद्र पावडे (23, रा. लक्ष्मीनगर, संगमनेर), संदीप उर्फ जब्या संजय वाल्हेकर (24, रा. अठरा पगड, वेल्हाळे रोड, संगमनेर) व दीपक सोमनाथ वैराळ (23, रा. ढोलेवाडी, ता. संगमनेर) यांना शिताफीने अटक करण्यात आली. उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे.

अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता 15 सप्टेंबर 2025 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो.उपनिरीक्षक इम्रान खान करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे (श्रीरामपूर), उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे (संगमनेर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

अलीकडील काही दिवसांपासून संगमनेर शहर व परिसरात खंडणी, लुटमार, घरफोडीचे प्रकार घडत असून पोलिसांकडून वाढीव गस्त व तत्पर कारवाई केली जात आहे. नागरिकांनीही सावध राहून कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना तात्काळ द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here