पुण्यातील व्यापऱ्याचे अपहरण करणारी टोळी जेरबंद

0
7

संगमनेरात दोन गावठी कट्टे, काडतुसे जप्त

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर : पिंपरी-चिंचवड येथील एका व्यापार्‍याचे खंडणीसाठी अपहरण करून त्याला वाहनातून संगमनेरच्या दिशेने आणणार्‍या पाच आरोपींना संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने हिवरगाव पावसा टोलनाक्यावर सापळा रचून ताब्यात घेतले. या कारवाईत दोन गावठी बनावटीचे कट्टे, सहा जिवंत काडतुसे, पाच मोबाईल फोन तसेच गुन्ह्यात वापरलेली कार असा सुमारे 11 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दि. 9 मार्च रोजी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाघचौरे यांनी संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना फोनद्वारे माहिती दिली की, पिंपरी-चिंचवड येथील एका व्यापार्‍याचे अपहरण करून आरोपी काळ्या रंगाच्या स्विफ्ट युडीआय (युपी-70-एचआर-9272) या कारमधून आळेफाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने येत आहेत.


या माहितीच्या आधारे कुणाल सोनवणे यांनी तात्काळ पथकासह नाशिक पुणे महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाका येथे नाकाबंदी केली. तसेच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण साळुंके यांना माहिती देऊन खांडगाव फाटा येथेही नाकाबंदी करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान पिंपरी-चिंचवड स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही आरोपींचा पाठलाग करत होते.
रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास संशयित स्विफ्ट तऊख कार टोलनाक्यावर येताच पोलिसांनी सापळा रचून वाहन थांबवले. वाहनाची तपासणी केली असता त्यात पाच संशयित आढळून आले. त्यांची झडती घेतली असता दोन गावठी कट्टे व सहा जिवंत काडतुसे तसेच मोबाईल फोन आढळून आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे- चंद्रशेखर दीपकचंद्र गौड (वय 34), दिलीप मोहनलाल सरोज (वय 28), रिंकू अलगुराम सरोज (वय 17), अनिल गिरीधारीलाल सरोज (वय 26) मुकेशकुमार राममुदर चव्हाण (वय 24) हे सर्व आरोपी उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 101/2026 नुसार बीएनएस कलम 140(1), 140(2) व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पकडण्यात आलेल्या आरोपींना पुढील कारवाईसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक प्रविण साळुंके तसेच पोलीस कर्मचारी बापुसाहेब हांडे, राहुल सारवंदे, सुनील ढाकणे, संतोष फड, शांताराम मालुजकर यांच्यासह इतर पोलिसांनी केली. या वेळी हिवरगाव पावसा टोलनाक्याचे व्यवस्थापक व कर्मचार्‍यांनीही पोलिसांना सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here