संगमनेरची ‘जेन झी’ बेफाम !

0
956

संगमनेरात तरुणाईचे जीवघेणे खेळ सुरू, पालक हतबल, पोलीस निष्क्रिय

नाशिक-पुणे महामार्गावरील 132 केव्ही समोर दोन तरुणांनी दुचाकीवर जीवघेणा स्टंट करताना अपघात घडवून आणला. हा प्रकार म्हणजे साक्षात यमदूताला निमंत्रण ठरला. सुदैवाने ते दोघे बचावले; पण ही घटना संपूर्ण शहरासाठी भीतीदायक इशारा आहे. अशा घटनांमुळे केवळ अपघातच नव्हे तर शहरातील सर्वसामान्यांचे प्राणही धोक्यात येत आहेत.

युवावार्ता (संजय आहिरे)
संगमनेर – जगभरात जेन झी (1997 ते 2012 दरम्यान जन्मलेली तरुणाई) ही पिढी भ्रष्टाचार, बेरोजगारीविरोधात लढा देत समाजात परिवर्तन घडवून आणते आहे. नेपाळमध्ये याच तरुणाईने भ्रष्ट सत्तेला खाली खेचून नवा इतिहास घडवला. पण संगमनेरची जेन झी मात्र उलट्या दिशेने धावत असून समाजासाठी गंभीर धोक्याची घंटा ठरत आहे.
ही तरुणाई कर्तव्य, जबाबदारी आणि संस्कारांना दूर लोटून बेफामपणे रेसर गाड्या, कर्णकर्कश सायलेंसर, टवाळखोरी, हाणामारी, छेडछाड, रॅगिंग अशा गैरप्रकारांत गुंतताना दिसते आहे. कॉफी शॉप, सायबर कॅफे, पार्लर यांच्या आडूनही अनेक तरुण वाईट उद्योगांकडे वळले आहेत. सोशल मीडियाच्या नादात, रिल्स-सेल्फीच्या वेडात ही पिढी स्वतःच्याच नव्हे तर इतरांच्याही जीवाशी खेळ करत आहे. आज पालक आर्थिक चक्रव्यूहात अडकले आहेत. घरात पैसा व समृद्धी आली; पण संस्कार हरवले. मुलांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. मोबाईल, गॅझेट्स व चैनीत वाढलेली ही पिढी मार्गभ्रष्ट होत असून त्याचे दुष्परिणाम आता संपूर्ण समाजाला भोगावे लागत आहेत.


संगमनेरात पोलिस यंत्रणा नावापुरती उरली आहे. राजकीय दबाव, हफ्तेखोरी आणि बेफिकिरी यामुळे पोलीस तरुणाईच्या गैरप्रकारांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करतात. नागरिकांकडून येणार्‍या तक्रारींची नोंद होते; मात्र त्या केवळ कागदावरच राहतात. शहरातील कायदा व सुव्यवस्था कोलमडत असून, पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगारांचेच मनोबल वाढले आहे. समाजासमोर काही गंभीर प्रश्‍न निर्माण झाले आहे. कायद्याचा वचक संपल्यामुळे, संस्कारांचा अभाव, व्यसनाधीनता, धार्मिक कट्टरता, द्वेष पसरवणारे विचार आणि सोशल मीडियाचे अतिरेकी व्यसन यामुळे संगमनेरची जेन झी एका धोकादायक वाटेवर चालली आहे. कर्तव्यपरायण, अभ्यासू आणि प्रामाणिक तरुणाईलाही या बेफाम पिढीमुळे अडथळे सहन करावे लागत आहेत. संगमनेरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न अतिशय गंभीर झाला आहे. पालकांनी आता मुलांवर कठोर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्याचवेळी पोलिस यंत्रणेनेही निष्क्रियता सोडून कठोर कारवाईस सुरुवात केली पाहिजे. शहरातील वाढते अवैध धंदे, बेफाम गाड्यांचे उच्छाद, छेडछाड व रस्त्यावरचे स्टंट थांबवण्यासाठी संगमनेरला खमक्या, निर्भीड अधिकार्‍याची आवश्यकता भासत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here