संगमनेर फेस्टिवलमुळे नामांकित कलाकारांसह स्थानिकांनाही हक्काचे व्यासपीठ- आ. खताळ

संगमनेर (प्रतिनिधी)-
राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष आणि मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनीष मालपाणी आणि त्यांच्या सहकार्यांनी गेल्या सतरा वर्षांपासून सुरू ठेवलेला ‘संगमनेर फेस्टिवल’ म्हणजे समृद्ध संस्कृती आणि कलावैभवाचे दर्शन घडविणारे श्रीमंत व्यासपीठ आहे, असे गौरवोद्गार आमदार अमोल खताळ यांनी काढले.
राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहाने आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिवलच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी, मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी, विजय पतसंस्थेचे चेअरमन डॉ. पराग सराफ, शारदा पतसंस्थेचे चेअरमन सीए संकेत कलंत्री, स्वदेश प्रॉपर्टीच्या संचालिका संगीता देशमाने, मंडळाचे कार्याध्यक्ष सुमित अट्टल, माजी कार्याध्यक्ष ओंकार इंदाणी, उपाध्यक्ष सागर मणियार, सचिव कल्पेश मर्दा, खजिनदार प्रतीक पोफळे, सहसचिव कृष्णा आसावा, सहखजिनदार वेणुगोपाल कलंत्री आदी उपस्थित होते.
आमदारांवरील हल्ल्याचा निषेध!
संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन सोहळ्यानंतर निघालेल्या आमदार अमोल खताळ यांच्यावर अचानक एका माथेफिरूने हल्ला केला. हा प्रसंग घडला त्यावेळी मालपाणी उद्योग समूहाचे सुरक्षारक्षक त्यांच्या आसपासच असल्याने त्यांनी तत्काळ आरोपीला जेरबंद केले. या घटनेने कार्यक्रम स्थळावर काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता. हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर नाटकाच्या मध्यंतरात मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी प्रेक्षकांना घडलेल्या प्रसंगाची माहिती देत या भ्याड हल्ल्याचा निषेधही नोंदवला.
संगमनेरची सांस्कृतिक परंपरा जोपासताना गेल्या 75 वर्षांपासून अखंडितपणे कार्यरत असलेल्या राजस्थान युवक मंडळाचे कौतुक करताना त्यांनी मंडळाच्या विविध उपक्रमांचा दाखलाही दिला. संगमनेर फेस्टिवलमुळे नामांकित कलाकारांसह स्थानिकांनाही हक्काचे व्यासपीठ मिळाल्याने अनेक कलाकारांची कला बहरल्याचेही ते म्हणाले. यावर्षीच्या गणेशोत्सवात वेगळा जोश असल्याचा उल्लेख करीत त्यांनी योगायोगाने आपण आमदार झाल्यानंतर गेल्या एक दशकापासून खंडित असलेली मालपाणी उद्योग समूहाची शाही गणेश विसर्जन मिरवणूकही यंदा पाहण्याची संधी मिळणार असल्याचे सांगत, मालपाणी परिवार राजस्थान मंडळाच्या माध्यमातून संगमनेरचे सांस्कृतिक आणि धार्मिक वैभव जोपासण्याचे आणि त्यात वाढ करण्याचे काम करीत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणात केला.
संगमनेर फेस्टिवलचे जनक मनीष मालपाणी यांनी मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षात साजरा होणारा संगमनेर फेस्टिवल अनोखा असल्याचे सांगितले. माहेश्वरी समाजाच्या पूर्वजांनी राजस्थान मंडळाची स्थापना करून सामाजिक कार्याचा श्रीगणेशा केला. आज या मंडळात समाजातील दोनशे तरुण कार्यकर्त्यांची फळी कार्यरत आहे. यावर्षी तरुणांची कार्यकारिणी निवडली गेल्याने संपूर्ण मंडळ मोठ्या उत्साहाने काम करीत असल्याचे सांगताना त्यांनी भविष्यात सामाजिक व सांस्कृतिक परंपरा वाहणारी सक्षम पिढी तयार झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळच्या फेस्टिवलच्या आयोजनाचे प्रायोजकत्व स्वीकारणार्या संगमनेर मर्चंट्स बँक, शारदा पतसंस्था, विजय पतसंस्था व स्वदेश प्रॉपर्टीज यांच्याविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. फेस्टिवलच्या शुभारंभाप्रसंगी मालपाणी उद्योग समूहाच्या सुरक्षा विभागाने शानदार पथसंचलन सादर केले. यावेळी सवाद्य आणलेल्या ज्योतीने फेस्टिवल ज्योत प्रज्वलित करून आमदार खताळ यांच्या हस्ते संगमनेर फेस्टिवलचा शुभारंभ झाला. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजीही करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष सुमित मणियार यांनी केले. सूत्रसंचालन रमेश घोलप, रोहित मणियार व चेतन नावंदर यांनी तर, आभार कल्पेश मर्दा यांनी मानले. शुभारंभदिनी सादर झालेल्या ‘वर्हाड निघालंय लंडनला’ या संदीप पाठक यांच्या एकपात्री नाट्यप्रयोगाने संगमनेरकरांची मने जिंकली.