युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे दिर्घ रजेवर गेल्याने त्यांच्या जागेवर प्रभारी पदभार पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. सध्या शहरात सुरू असलेले अवैध धंदे, गुंडाच्या टोळ्या, चोरट्यांचा उच्छाद, गो हत्या असे अनेक प्रकारची गुन्हेगारी वाढलेली असून अल्पकाळ का होईना त्यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी पो. नि. चव्हाण यांच्यावर आली आहे.
पोलीस निरीक्षक मथुरे हे अचानक रजेवर गेले आहे. मात्र, संगमनेर शहर पोलीस ठाणे हे जिल्ह्यातील महत्त्वाचे पोलीस ठाणे असल्याने येथील पोलीस निरीक्षक पद असे रिक्त ठेवता येणार नाही म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तातडीने येथे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांना पाठवले आहे. चव्हाण यांनी यापूर्वी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा कारभार सांभाळलेला आहे. त्यामुळे येथील गुन्हेगारीची त्यांना कल्पना आहे. परंतु गेल्या काही कालावधीत वाढलेल्या चोर्या, लुटमार, टवाळखोरांची दहशत आणि गुन्हेगारीचे वाढलेले प्रमाण, वाहतूक समस्या व त्यातून होणारे प्रश्न रोखण्यात त्यांना यश येते की नाही हे – पाहावं लागणार आहे. शहरात गुन्हेगारीबरोबरच वाळू तस्करी, पोलीसांची हप्तेखोरी, निष्काळजीपणा यासह अनेक त्रृटी पोलीसांच्या कर्तव्यात दिसून येत आहे. याकडेही प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन चव्हान यांना लक्ष द्यावे लागणार आहे.
दरम्यान पो. नि. नितीन चव्हाण हे पुन्हा एकदा शहर पोलीस ठाण्यात आल्याने सध्या त्यांना भेटण्यासाठी व जुनी ओळख दाखवून पुन्हा आपले हितसंबंध जपण्यासाठी पोलीस ठाण्यात रांगा लागत आहे. साहेबांकडून हार, सत्कार स्विकारला जात असला तरी शहरातील गुन्हेगारीचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.