संगमनेरात मे महिन्यात अवकाळीचा धुमाकूळ, तालुक्यात दाणादाण

0
773

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रोज सायंकाळी व रात्री वादळी वार्‍यांसह जोरदार पाऊस बरसत आहे. या वादळीच्या अवकाळीने अनेक ठिकाणी विजेचे खांब झाडे उन्मळून पडले. त्यामुळे विद्युत ठिकठिकाणी पुरवठा खंडित झाला आहे. झाडे रस्त्यावर आडवी झाली. शेताचे तळे झाले तर आश्‍वीमध्ये दोन मजली घरावर वीज कोसळली. कमी जास्त प्रमाणात संपूर्ण तालुक्यात या अवकाळी पावसाने दाणादाण उडविली असून बळीराजा मेटाकुटीला आला आहे. जुनच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस मे महिन्यात पडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे जाणकार सांगत आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून संगमनेर तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. तालुक्यातील काही भागात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. सोमवारी पुन्हा एकदा सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. वार्‍याचा वेग अधिक असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजेचे खांबही पडले. झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. शेतात सर्वत्र पाणी साचले. उन्हाळी कांदा, टोमॅटो पिकांसह इतरही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे दीड ते दोन तास जोरदार पाऊस पडला.
पंचायत समिती जवळ झाड उन्मळून रस्त्यावर पडल्याने लोणी, श्रीरामपूर, नगरकडे जाणारी वाहतूक काही काळ बंद झाली होती. गणेश विहार, मालाड रोड याठिकाणी वीजेचा खांब तुटून पडल्याने रात्रभर नागरीकांना अंधारात रहावे लागले.
शहरातील नवीन नगर रोड, मालदार रोड, बस स्थानक परिसर, शिवाजी महाराज पुतळा, विठ्ठलनगर, अकोले नाका भागात पाणी साचून रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. शहर बसस्थानकासमोर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने रस्ता की नदी असा प्रश्‍न वाहनचालकांना पडला होता.

संगमनेर तालुक्यातील आश्‍वी परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून वादळी-वार्‍यांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे मका, हळद, कांदा, टोमॅटो, गवार, चारा यांसह आंबा, डाळिंब या फळपिकांचे नुकसान झाले. सोमवारी दुपारनंतर आलेल्या पावसाने मोठे थैमान घातल्याने शेतकर्‍यांचे शेती व पिकांचे नुकसान झाले असून आश्‍वी खुर्द येथे तर विक्रम दिलीप मांढरे यांच्या डबल मजली असणार्‍या शेतकर्‍याच्या बंगल्यावर वीज पडली. डबल मजली इमारत असल्याने जीवीत हानी टळली तर सर्व इलेक्ट्रीक उपकरणे जळून खाक होऊन बंगल्याला मोठे दोन छिद्र पडले.
आश्‍वी, पानोडी, शिबलापूर, पिंप्री लौकी अजमपूर, खळी, मालुंजे, शेडगांव, हंगेवाडी, डिग्रस, अंभोरे, कनोली, मनोली, उंबरी, ओझर आदी ठिकाणी रात्रं दिवस लहरी नुसार अवकाळी पाऊस कोसळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here