प्रशासकीय राज व निधी अभावी कामे ठप्प

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर नगरपरिषदेवर तीन वर्षांहून अधिक काळ प्रशासकीय राज सुरू आहे. यामुळे विकास कामांना मोठ्या मर्यादा आल्या आहेत. शहरातील नागरी समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरातील रस्त्यांची मोठी चाळण झाली आहे. खड्डे आणि धुळ यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. निधी अभावी आणि प्रशासकीय राज यामुळे रस्त्यांची कामे रखडली असून त्याचा नागरीकांना प्रचंड त्रास होत आहे.
संगमनेर शहर विकासात पुढे असल्याचा दावा केला जात आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून शहरातील नागरी समस्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. रस्ते, गटारी, अतिक्रमण, वृक्षतोड, अस्वच्छता हे प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहेत. शहरातील अनेक मुख्य रस्त्यावरील डांबर उडून खडी उघडी पडली आहे तर भुमिगत गटारीसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण झाले नाही. तात्पुर्ती मलमपट्टी वगळता या रस्त्याचे कामे होत नसल्याने रस्त्यांची प्रचंड दुरावस्था होत आहे. शहरात नुकताच मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून गेला. यामुळे देखील रस्ते खराब झाले आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण आणि धुळीचे साम्राज्य यामुळे वाहन चालकसह नागरीक त्रस्त आहे. विकास कामांना निधी नसल्याने व निर्णय होत नसल्याने या रस्त्यांची कामे कधी पुर्ण होणार याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.