अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे संपतराव बोरकर ‘आप्पा’ काळाच्या पडद्याआड

0
135

संगमनेर (प्रतिनिधी)- अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे माजी रजिस्ट्रार, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे अत्यंत विश्वासू व जवळचे सहकारी कै. संपतराव रामकृष्ण बोरकर यांचे मंगळवार, ३ फेब्रुवारी २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने अमृतवाहिनी संस्थेसह संपूर्ण सहकार व शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कै. संपतराव बोरकर हे अत्यंत करारी, शिस्तप्रिय आणि कामावर अपार निष्ठा ठेवणारे व्यक्तिमत्त्व होते. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेची पायाभरणी होत असताना संस्थेची सर्व सूत्रे त्यांनी आपल्या सक्षम हातात घेतली. संस्थेच्या उभारणीच्या काळात प्रशासन, शैक्षणिक नियोजन, शिक्षक भरती, विद्यापीठाशी समन्वय, तसेच दैनंदिन कामकाजाची शिस्तबद्ध रचना उभी करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.

१९८३ च्या सुमारास अमृतवाहिनी संस्थेचे कामकाज कोणत्या पद्धतीने चालले पाहिजे, गुणवत्ताधारित शिक्षक भरती कशी केली पाहिजे, विद्यापीठाशी संवाद आणि नियमपालन कसे असावे, याची सर्व जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या कै. संपतराव बोरकर यांनी महाविद्यालयीन इमारतींच्या बांधकामातही जातीने लक्ष घातले. ८० च्या दशकात बाहेरील राज्यांमधून होणारी प्रवेश प्रक्रिया, विद्यार्थ्यांशी थेट संवाद, कडक शिस्त आणि स्पष्ट निर्णयक्षमता यामुळे संपूर्ण कॅम्पसमध्ये त्यांची ‘आप्पा’ या नावाने ओळख निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत ते नेहमीच आग्रही असत. त्यांच्या शब्दाला संस्थेमध्ये, पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये खूप किंमत होती. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या निधनानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कै. संपतराव बोरकर यांच्यावर अतिशय विश्वासाने अमृतवाहिनी संस्थेच्या कामकाजाची मोठी धुरा सोपवली होती.

मूळचे जोर्वे येथील असलेल्या कै. संपतराव बोरकर यांना त्यांच्या पत्नी भिमाबाई बोरकर यांनी आयुष्यभर मोलाची साथ दिली. त्यांनी घराची संपूर्ण जबाबदारी समर्थपणे सांभाळत पतीच्या सामाजिक व सहकार क्षेत्रातील कार्याला भक्कम आधार दिला. कै. संपतराव बोरकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव डॉ. भारत बोरकर हे अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. दुसरे चिरंजीव दौलत बोरकर हे भारतीय सैन्यदलात कार्यरत असून त्यांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.

कुटुंबप्रमुख म्हणूनही कै. संपतराव बोरकर अतिशय आपुलकीने सर्व नातेसंबंध जपत असत. भाऊ शशिकांत बोरकर, बादशाह बोरकर, अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विभागप्रमुख डॉ. भास्कर बोरकर तसेच सौ. शिलाताई करंजेकर यांनी बोरकर कुटुंबाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. दिवाळी व इतर सण-उत्सवांच्या निमित्ताने संपूर्ण बोरकर कुटुंब जोर्वे येथे एकत्र येत असे, ही त्यांची खास ओळख होती.कै. संपतराव बोरकर यांच्या पश्चात तीन भाऊ, एक बहिण, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.

दुपारी १ वाजता जोर्वे (प्रवरातिरी) येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी त्यांच्यावर प्रेम करणारे मित्रपरिवार, नातेवाईक, सहकारी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कै. संपतराव बोरकर यांच्या निधनाने अमृतवाहिनी संस्थेच्या इतिहासातील एक निष्ठावंत आणि कर्तव्यदक्ष अध्याय संपला असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. कै. संपतराव बोरकर यांना दैनिक युवावार्ता परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here