आघाडी आणि कुरघोडीच्या राजकारणात रूपवते परिवार वंचित

उत्कर्षा रूपवतेंची वंचितकडून चाचपणी, मविआला धोका

रूपवते परिवाराचे या जिल्ह्यात शिक्षण आणि सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. या तिसर्‍या पिढीच्या प्रतिनिधी म्हणून व चौधरी आणि रूपवते या राजकीय परिवाराचा वारसा जपणार्‍या उत्कर्षा रूपवते या शिर्डीसाठी नवा चेहरा म्हणून सक्षम पर्याय होता. तसेच हा मतदारसंघ राखीव असताना देखील या मतदारसंघात अनुसूचित जातीतील बौद्ध समाजावर मोठा अन्याय झाल्याची भावना समाजात आहे. रूपवते यांच्या रूपाने हा अन्याय दूर करण्याची मोठी संधी मविआला होती. परंतु नेहमीप्रमाणे मविआने ही संधी घालवली व बौद्ध समाजाला खर्‍या अर्थाने वंचित ठेवले. त्यामुळे उत्कर्षा रूपवते या वंचितांच्या जवळ गेल्या आहेत. माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार सुधीर तांबे यांनी पुढाकार घेऊन रुपवते यांना बळ देणे गरजेचे होते परंतु तसे झाले नाही. खर्‍या अर्थाने पुरोगामी विचारधारा जपणार्‍या व राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा उमटवणार्‍या उत्कर्षा रूपवते यांची बंडखोरी मविआला धोकादायक ठरणार यात शंका नाही.

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
राजकारणात आजच्या घडीला निष्ठा, तत्व, प्रामाणिकपणा, विचार या गोष्टींना कुठेही थारा नाही किंवा किमंत देखील नाही. साखरपुडा एकाशी, लग्न दुसर्‍याशी तर हनिमून तिसर्‍याशी अशी अवस्था सध्याच्या राजकारणाची झाली आहे. आघाडी आणि कुरघोडी या दोन शब्दांनी संपूर्ण राजकारण बिघडून गेले आहे. परंतु आजही काही घराणे व काही नेते मात्र याला अपवाद ठरत आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे रुपवते कुटुंब.


नगरच्या राजकारण, समाजकारण, शिक्षण या क्षेत्रात अनेक घराणे असून त्यात रूपवते यांच्या देखील घराण्याचा समावेश होतो. काँग्रेसच पक्षाशी एकनिष्ठ असणारे परंतु कायमच राजकीय वनवासात व राजकीयदृष्या वंचित राहिलेल्या या कुटुंबाच्या उत्कर्षा रूपवते या तिसर्‍या पिढीच्या वारसदार. स्व. दादासाहेब रूपवते हे काँग्रेसचे निष्ठावान नेते होते. तोच वारसा पुढे स्व. प्रेमानंद रूपवते यांनी चालविला. दरम्यान शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर या मतदारसंघातून स्व. प्रेमानंद रूपवते हे नक्की खासदार होतील अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र काँग्रेस पक्षाने नेहमीप्रमाणे त्यांची उमेदवारी डावलली. त्यांच्या अकस्मात निधनानंतर त्यांच्या राजकीय वारसदार उत्कर्षा रूपवते यांच्या बाबत पक्ष सहानुभूतीने निर्णय घेईल असे वाटत असतानाच पुन्हा आघाडीच्या राजकारणात त्यांचा बळी देण्यात आला. शिर्डीत महाविकास आघाडीकडून गद्दारीचा शिक्का बसलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली. तर महायुतीकडून दुसरे गद्दार म्हणून प्रसिद्ध झालेले सदाशिव लोखंडे या आजी माजी खासदारांमध्ये थेट लढत होणार आहे.
दरम्यान शिर्डीची उमेदवारी काँग्रेसला मिळवण्यात पक्षश्रेष्ठींना पुन्हा मोठे अपयश मिळाले आणि त्यामुळे नाराज झालेल्या इच्छुक उमेदवार उत्कर्ष रूपवते यांनी काँग्रेसची साथ सोडावी का? पक्ष आपल्या निष्ठेची कदर करत नसेल तर आपणही वेगळा मार्ग का अवलंबू नये या विचारातून त्यांनी बंडखोरीची तयारी सुरु केल्याचे समजते. त्यांनी नुकतीच मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची सदिच्छा भेट घेतली. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या राजकारणात पुन्हा एकदा नवीन ट्विस्ट आला आहे.
राज्याच्या महिला आयोगाच्या सदस्या आणि काँग्रेसच्या युवा नेत्या उत्कर्षा रूपवते यांनी या वेळी महाविकास आघाडी कडून लोकसभा निवडणुक लपविण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू केले होते. शिर्डी लोकसभा मतदार संघ पिंजून काढतांना, काँग्रेस कार्यकर्त्यांसह सर्वच समाजाला सोबत घेऊन जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यांच्या दिवंगत वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची हीच संधी आहे यासाठी त्यांनी सर्व प्रयत्न केले. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ही जागा खेचून आणण्यात अपयशी ठरले आणि ही जागा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला गेली. सध्या राज्याच्या राजकारणात खोके आणि गद्दारी हे दोन शब्द चांगलेच गाजत असताना भले ही जागा शिवसेनेला गेली तरी निष्ठेचा निकष लावून शिवसेनेच्या तिकीटावर मविआचा उमेदवार म्हणून आपल्याच संधी मिळेल अशी आशा रूपवते यांना होती. मात्र शिवसेनेशी गद्दारी केलेले भाऊसाहेब वाकचौरे हे पुन्हा शिवसेनेत आले आणि त्यांची गद्दारी विसरून पक्षाने त्यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या उत्कर्षा रूपवते यांनी समाज माध्यमातील वॉलवरून काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो आणि चिन्ह काढून टाकल्याने, त्यांनी काँग्रेसच्या हातातील हात काढून घेतल्याने त्या पुन्हा चर्चेत आल्या आणि त्यांनी थेट वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने आता शिर्डी मतदारसंघात उत्कर्षा रुपवते या वंचित आघाडीकडून निवडणूकीत रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले. त्यांनी वंचित आघाडीकडून उमेदवारी केल्यास, त्यांच्या रूपाने शिर्डी लोकसभेला नवा चेहरा मिळणार आणि त्या निवडून येणार असल्याच्या प्रतिक्रिया सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. तर त्यांच्या उमेदवारीमुळे तर उबाठा गटाचे भाऊसाहेब वाकचौरे आणि शिंदे गटाचे खा. लोखंडे यांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर पडलेल्या गद्दारीचा शिक्का काही केल्या पुसला गेलेला नाही. अवघ्या 17 दिवसात केवळ नशीब आणि मोदी लाटेवर स्वार होऊन विजयी झालेले शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी पुन्हा निवडून येण्याचे स्वप्न पाहिले असले तरी, त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे व मिस्टर इंडिया या उपाधीमुळे या मतदारसंघात त्यांच्यावरही प्रचंड नाराजी आहे. मुंबईत रमणारे, मतदारसंघात न फिरकणारे गद्दारी करून एकनाथ शिंदे यांच्या गोटात जाणारे अशी नकारात्मक भावना त्यांच्याबद्दल मतदारसंघात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख