परदेशपुरा नागरीकांची एकमुखी मागणी
मागणी पूर्ण न झाल्यास मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्याकडे तक्रार करणार – प्रसाद पवार
युवावार्ता (प्रतिनिधी)-
संगमनेर – शहरातील परदेशपुरा परिसरातील जुन्या पाण्याच्या टाकीजवळ शहरातील सफाई कामगारांची अनधिकृत वसाहत निर्माण झाली आहे. मात्र या सफाई कर्मचार्यांमुळे या परिसरात अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्याचा मोठा त्रास या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे या सफाई कर्मचार्यांचे दुसर्या जागेत स्थलांतर करावे अशी मागणी नागरिक करत आहेत. येथील रहिवाशांनी अनेकदा याबाबत पालिका मुख्याधिकार्यांना निवेदन दिले आहे. परंतु, अजूनही त्यावर उचित कार्यवाही झालेली नसल्याने शिवसेनेचे माजी शहरप्रमुख प्रसाद पवार यांनी थेट मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा दिला आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की मुख्याधिकारी राहुल वाघ यांना परदेशपुरा येथील नागरिकांनी वेळोवेळी सफाई कर्मचारी व घंटागाड्यांमुळे होणार्या त्रासाबद्दल माहिती दिली आहे. परंतु आज- उद्या स्थलांतर करतो म्हणून अनेक महिने वेळ मारून नेली आहे. स्थानिकांनी उपोषण करण्याचा इशारा दिला असता मुख्याधिकार्यांनी उपोषणास बसू नका दोन महिन्यांत त्यांची व्यवस्था करतो असे लेखी सांगितले. याला देखील सहा महिने झाले, तरी कार्यवाही केली नाही. पंधरा दिवसांपूर्वी देखील याबाबत विचारणा करण्यासाठी मुख्याधिकार्यांकडे गेले असता 7 दिवसांत कार्यवाही करतो असा शब्द दिला. तरीही अद्याप कोणतीही पावले उचलेले नाही.
साफसफाईचा ठेका घेणार्या ठेकेदाराने कर्मचार्यांच्या राहण्याची व घंटागाड्या उभ्या करण्याची व्यवस्था करणे क्रमप्राप्त असताना पालिका प्रशासन त्याची का पाठराखण करते ? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. सदर सफाई कामगार याठिकाणी अस्वच्छता करतात, येथील सार्वजनिक स्वच्छता गृहाची अवस्था करून ठेवली आहे. कचरा आस्तावेस्त पसरवितात, मद्यपान करून धिंगाणा घालतात त्यामुळे देखील या परिसरातील शांतता भंग होत आहे. या परिसरात वाढती दुर्गंधी, अशांतता, छेडछाड, असे अनेक प्रश्न वाढल्याने येथील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन कार्यवाही करावी. अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री डॉ. तान्हाजी सावंत यांच्याकडे दाद मागावी लागेल, असा इशारा शिवसेनेचे माजी शहरप्रमुख प्रसाद पवार यांनी दिला आहे.