
शिवसेना संघटन बळकट करण्यासाठी कानकाटे यांच्यावर जबाबदारी
संगमनेर (प्रतिनिधी)-
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे शहर प्रमुख अप्पा केसेकर हे राजकारणात सक्रिय नसल्याने तसेच शिवजयंती सोहळ्यासाठी पक्षाच्या वतीने कोणताही पुढाकार न घेतल्याने त्यांचे शहर प्रमुखपद स्थगित करण्यात आले आहे. त्यांच्या जागी शिवसेनेचे शहर संघटक असलेले रवींद्र उर्फ पप्पू कानकाटे यांची प्रभारी शहर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कानकाटे यांच्या रूपाने शिवसेनेला युवा व सक्रिय कार्यकर्ता मिळाला आहे. त्यांच्या निवडीचे शिवसेनेतून स्वागत होत आहे.
शिवसेनेत दुफळी निर्माण झाल्यानंतर शिवसेनेची दोन शकले झाली. एक सत्तेत तर दुसरा विरोधी पक्षात राहिला. त्यामुळे पक्षात काही प्रमाणात मरगळ देखील आली.

त्यातच शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांच्या जागी पक्षाने अप्पा केसेकर यांच्यावर शहराची जबाबदारी सोपवली. मात्र केसेकर यांनी पक्ष संघटनेत कोणतेही लक्ष दिले नाही. त्यातच शिवजयंती सोहळ्यात ठाकरेंच्या शिवसेनेने कोणतीही भुमिका घेतली नाही. त्यामुळे पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अखेर पक्षाने याची दखल घेत शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सहसंपर्कप्रमुख ॲड. दिलीप साळगट आणि उपजिल्हाप्रमुख अशोक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शिवसेना संघटक रवींद्र उर्फ पप्पू कानकाटे यांची प्रभारी शहर प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. या निवडीनंतर रवींद्र कानकाटे यांची पक्षनेतृत्वाचे आभार मानत आपल्यावर टाकलेल्या जबाबदारीचे योग्य पालन करुन पक्षाला मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे सांगितले. या निवडीबद्दल कानकाटे यांचे शहरात अभिनंदन केले जात आहे.