कलेप्रती बांधिलकी मानणारा कलाकार – रघुवीर खेडकर

0
233

रघुवीर खेडकर, मराठमोळ्या तमाशातील अतिशय लोकप्रिय सोंगाड्या. तमाशामहर्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम खेडकर आणि वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे चिरंजीव असलेल्या रघुवीर यांचा जन्म ६ ऑगस्ट १९६१ रोजी मुंबईत झाला. मुंबईच्या हनुमान थियेटरमध्ये तुकाराम खेडकर यांच्या तमाशाचा कार्यक्रम असताना कांताबाईंच्या पोटी जन्म घेतलेल्या रघुवीर यांनी वयाच्या पाचव्या दिवशी तमाशा रंगभूमीवर प्रवेश केला. एका वगनाट्यात तान्हे बाळ म्हणून कापडाची बाहुली वापरली जायची पण थियेटरमध्येच मुक्कामाला असलेल्या कांताबाईंच्या मांडीवरच्या तान्ह्या रघुवीरला त्यादिवशी रात्री स्टेजवर नेण्यात आले.

माझे वडील तुकाराम खेडकर, आई कांताबाई सातारकर यांनी मला जे कलेचे संस्कार दिले त्याचा आणि आमच्या एकूण तमाशा कलेचा हा सन्मान आहे हे सांगायला मला मनापासून आनंद आणि अभिमान वाटतो. . या आनंदाच्या प्रसंगी एकच खंत आहे हा सन्मान सोहळा बघण्यासाठी आई हवी होती…

रघुवीरच्या वयाच्या चौथ्या वर्षी तुकाराम खेडकर यांचे अकाली निधन झाले. काही कारणांनी आई कांताबाईंना तमाशातून नेसत्या कपड्यानिशी बाहेर पडावे लागले. पुढची चार पाच वर्षे कांताबाईंनी इतर तमाशात काम करून १९६९ मध्ये स्वतःचा तमाशा सुरु केला. लहानपणी रघुवीर आईसोबत फेटा घालून प्रेक्षकांना नमस्कार घालायाला स्टेजवर यायचा. वयाच्या नवव्या वर्षापासून रघुवीर खेडकर यांनी स्टेजवर येऊन चार दोन संवाद म्हणायला सुरुवात केली.

वडील तुकाराम खेडकर हे तमाशा सृष्टीतील अतिशय दिग्गज नाव. अभिनयाच्या बाबतीत त्यांचा सर्वदूर नावलौकिक. अशा परिस्थितीत आपण जर वगनाट्यात वडिलांप्रमाणे भूमिका केल्या तर लॉक नकळत आपली त्यांच्याशी तुलना करतील म्हणून रघुवीर यांनी तमाशात सोंगाड्या व्हायचं ठरवल. सत्तरच्या दशकाच्या अखेरपासून रघुवीर यांनी सोंगाड्या रंगवायला सुरुवात केली. तेव्हापासून ते आजपर्यंत ते तमाशातला सोंगाड्या रंगवीत आहेत. रघुवीर यांची खासियत म्हणजे ते स्वतः उत्तम सोंगाड्या तर आहेच परंतु ते उत्तम गायक, उत्तम नर्तक, उत्तम अभिनेता आणि कुशल समाज प्रबोधनकार देखील आहेत. तमाशाचा हंगाम नसताना उर्वरित ते गावोगाव प्रवचनाचे कार्यक्रम करतात.

१९८० पासून त्यांनी त्यांची आई ज्येष्ठ तमाशा कलावंत आणि तमाशा फड मालक कांताबाई यांच्याकडून तमाशा मंडळाची संपूर्ण सूत्रे हाती घेऊन तमाशाला एक नावे रूप दिले. १९६९ ते २०१९ पर्यंत कलाकार म्हणून आजवर सुमारे अकरा हजारहुन अधिकवेळा रंगमंचावर उभे राहून आपली कला सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. जसजसा काळ बदलत गेला तसे तमाशाच्या मूळ स्वरुपात बदल होत गेले. ऐंशीच्या दशकाच्या मध्यापासून टेलिव्हिजनचे युग सुरु झाले, रंगमंचीय आविष्कारात आधुनिकता आली. अनेक लोककला याच काळात लोकांना त्या कालबाह्य वाटल्या म्हणून काळाच्या उदरात गडप झाल्या. काळानुरूप बदल ही जगातल्या प्रत्येक गोष्टींसाठी आवश्यक गोष्ट आहे हे जाणून रघुवीर खेडकर यांनी तमाशातील जुन्या गोष्टींना काहीशा आधुनिकतेची जोड देऊन तमाशा रंगभूमीला उर्जितावस्थेत आणले. आज महाराष्ट्रात रघुवीर खेडकर जे जे काही करतात त्याचे अनुकरण इतर तमाशा मंडळे करतात. आज महाराष्ट्रात तमाशा कला टिकून आहे यात ज्या ज्या घटकांचा मोठा वाटा आहे त्यात रघुवीर खेडकर यांची दूरदृष्टी हेही एक महत्वाचे कारण आहे.

नागपूर येथील अक्कू यादव या गुंडाचा महिलांनी खून केल्यावर अवघ्या काही महिन्यात रघुवीर यांनी त्या घटनेवर वगनाट्य लिहून घेऊन तो वग तमाशा रंगभूमीवर आणला होता. देशाचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर त्या घटनेवर आधारित नाट्य रंगमंचावर सादर करणे अतिशय आव्हानात्मक होते. पण रघुवीर यांनी ते आव्हान पेलले आणि चक्क रंगमंचावर हवेत उडणारे हेलिकॉप्टर दाखवले. राजीव गांधी यांच्याप्रमाणे गोऱ्या रंगाचा व अस्खलित हिंदी बोलणारा पुरुष कलाकार मिळेना म्हटल्यावर त्यांनी आपली धाकटी बहिण मंदाराणी हिला राजीव गांधी यांची भूमिका दिली. या वगनाट्यात राजीव गांधी यांची हत्या स्फोटके वापरून केलेली दाखवण्यासाठी रघुवीर स्टेजवर खराखुरा स्फोट घडवून आणायचे. राजीव गांधी यांच्या भूमिकेतील मंदाराणी या छातीवर एक धातूचा पत्रा बांधून त्यावर फटाके बांधायच्या. स्टेजवर स्फोट होताच रक्ताच्या चिळकांड्या आणि नकली मांसाचे तुकडे थेट स्टेजजवळ बसलेल्या लोकांच्या अंगावर उडायचे तेव्हा प्रेक्षकही अचंबित व्हायचे. त्यांच्या या प्रयोगशीलतेला रसिकांनी त्यावेळी मोठी दाद दिली.

याच वगनाट्यादरम्यान स्टेजमागे खेळत असलेल्या रघुवीर यांच्या चार पाच वर्षांच्या भाच्याने शेकडो आपटबारांनी भरलेल्या लोखंडी पेटीचे झाकण उघडून आपटले तेव्हा प्रचंड मोठा स्फोट झाला. जवळच बसलेला एक सोंगाड्या जागीच ठार झाला, भाचा जबर जखमी झाला. अशा परिस्थितीत यात्रेत मोठा गोंधळ माजला. लोक शांत व्हावे म्हणून पुन्हा तमाशा सुरु करणे गरजेचे होते. तेव्हा आपल्या कलेवरच्या बांधिलकीला प्राधान्य देऊन रघुवीर यांनी जखमी भाच्याला आई कांताबाईसोबत दवाखान्यात पाठवून आणि स्फोटात मरण पावलेल्या आपल्या सहकलाकाचे प्रेत राहुटीत झाकून ठेऊन काही वेळात लगेच पुन्हा तमाशा सुरु केला. लोक तमाशाला आपले दु:ख विसरायला येतात त्यामुळे सोंगाड्याने आपले वैयक्तिक दु:ख बाजूला ठेऊन लोकांना हसवले पाहिजे या भावनेतून अगदी तरुण वयात पत्नी निधनानंतर अवघ्या पाचव्या दिवशी ते सोंगाड्या म्हणून स्टेजवर उभे राहिले होते.

कलेप्रती बांधिलकी दाखवण्याबरोबरच ते आपली सामजिक बांधिलकीही जपतात. कलाकार हा समाजातील सर्व घटकांप्रती जबाबदार असतो अशी भूमिका घेऊन रघुवीर खेडकर हे दरवर्षी अनेक शाळा, सामाजिक संस्था, गरजू रुग्णांना आर्थिक मदत, वाचनालये आणि मंदिरांच्या उभारणीसाठी मोफत कार्यक्रम सादर करतात. त्यांच्या उदार देणगीतून आजवर अनेक शाळांच्या वर्ग खोल्या, अनेक वाचनालये, अनेक गोरगरीब रुग्णांची मोठ्या खर्चाची ऑपरेशन झाली आहे. १९८० पासून ते २०१९ पर्यंत ३९ वर्षात त्यांनी सुमारे साडेचारशेहुन अधिक ठिकाणी विनामोबदला कार्यक्रम सादर करून सुमारे दीड कोटी रुपयांहून अधिक रक्कम देणगी म्हणून दिली आहे.

तमाशा हे समाजप्रबोधनाचे सर्वाधिक प्रभावी माध्यम आहे हे ओळखून रघुवीर खेडकर यांनी मनोरंजनाबरोबर तमाशातून व्यसनमुक्ती, स्वच्छता, गुन्हेगारीवृत्ती, कौटुंबिक कलह, महापुरुषांची गौरवगाथा असे विषय वग नाट्याच्या माध्यमातून हाताळून आपली सामाजिक भावना नेहमीच जपली आहे. त्यांनी आजवर वेगवेगळे विषय घेऊन सुमारे पन्नासहुन अधिक वग नाट्याचे नऊ हजार प्रयोग सादर केले आहेत. महाराष्ट्रात सर्वप्रथम केवळ महिलांसाठी तमाशाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे श्रेयही रघुवीर खेडकर यांना जाते.

अकलूज येथे झालेल्या ढोलकी फड तमाशा स्प्रधेत त्यांच्या तमाशा फडाने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा सन्मान मिळवलेल्या खेडकर यांना राज्यातील अनेक संस्थांनी विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. पुणे विद्यापीठाने त्यांच्या इतिहासात प्रथमच रघुवीर खेडकर यांचा सन्मान केला आहे. २०१० मध्ये दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी दिल्लीच्या रवींद्र भवन येथे तमाशा सादर करण्याचा मान रघुवीर यांना मिळाला होता. याचबरोबर संगीत नाटक अकादमीने चंडीगड येथे त्यांच्या तमाशाचे आयोजन केले होते.
आज रघुभाऊंना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. तमाशा क्षेत्रात पहिल्यांदाच पद्म पुरस्कार दिला जात आहे. वडील तुकाराम खेडकर आणि आई कांताबाई यांचा वारसा पुढे नेणाऱ्या रघुभाऊंचा हा सन्मान म्हणजे अवघ्या तमाशा सृष्टीचा सन्मान आहे.

डॉ. संतोष खेडलेकर, संगमनेर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here