आ. थोरात यांच्या हस्ते निर्मलसरिता पुस्तकाचे प्रकाशन

0
1175

सौ. सुलभाताई दिघे यांचा जीवन प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी

युवावार्ता (प्रतिनिधी)

संगमनेर – सहज योगाच्या माध्यमातून सातत्याने समाजातील लहान थोरांना आनंदी जीवनाच्या सल्ला देणाऱ्या जेष्ठ कार्यकर्त्या सौ सुलभाताई दिघे यांनी लिहिलेली निर्मल सरिता ही जीवन समृद्ध करणारी आत्मकथा असून या पुस्तकामुळे संगमनेरच्या साहित्य विश्वात भर पडली असल्याचे गौरवउद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या पुस्तकाचे शानदार प्रकाशन करण्यात आले. ग्रेप्स गार्डन येथे झालेल्या या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी आमदार बाळासाहेब थोरात, मा. आमदार डॉ.सुधीर तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, सौ.कांचनताई थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, लेखिका सौ सुलभाताई दिघे, ॲड शिवाजीराव दिघे, वैशाली कुलकर्णी, डॉ.हसमुख जैन, उद्योजक संजय दिघे, श्रीमती ललिता दिघे, विलास दिघे, उद्योजक अभिजीत दिघे, सुजित दिघे, कृष्णा दिघे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, परमपूज्य निर्मला देवी यांच्या सानिध्याने अध्यात्मिक उंची गाठलेल्या सहज योगाच्या प्रसारक सौ सुलभाताई दिघे यांच्या निर्मलसरिता या पुस्तकांमधून विविध घटना प्रसंग त्या मागील पार्श्वभूमी अत्यंत साध्या सोप्या आणि उत्तम पद्धतीने लिहिले आहेत. या पुस्तकातून सौ.सुलभाताई दिघे यांनी केलेली धडपड, शेती, समाजकारण, राजकारण आणि कुटुंब सांभाळून अध्यात्मातून इतरांच्या जीवनात निर्माण केलेल्या आनंद याचे वर्णन सुंदर पद्धतीने केले आहे. आमचे मामा अँड शिवाजीराव दिघे वकिली व्यवसाय करत असताना शेतीचे संपूर्ण नियोजन मामींनी केले. वालवड सारख्या पिकांमध्ये त्यांनी संगमनेरमध्ये क्रांती केली. महाराष्ट्रीयन माणूस कर्तृत्व करतो परंतु ते शब्दबद्ध करत नाहीत त्यामुळे पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या अनेक गोष्टी राहून जातात असेही ते म्हणाले. मामा 95 वर्षांचे आहेत आणि मामी 90 वर्षांच्या आहेत त्यामुळे कुटुंबाचा शारिरीक वारसा माझ्याकडे आहे. या वारसामुळे माझे राजकारण 100 वर्षे चालेल अशी कोपरखळी सुध्दा त्यांनी यावेळी केली. उपस्थितांमध्ये यावेळी एकच हशा पिकली.


तर मा.आ.डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, सुलभाताईंनी केवळ अध्यात्मातच नव्हे सर अमृतवाहिनी आणि संग्राम पतसंस्था यामध्ये संचालक पदावर काम करताना दरवेळी योग्य मार्गदर्शन केले आहे. सौ.कांचनताई थोरात म्हणाल्या की, शेती आणि निसर्गात राहणाऱ्या सुलभाताईंनी संगीताची आवड ही जोपासली असून अध्यात्मातून नवी पिढी घडवली आहे. तर सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, दिघे मामी या आनंदाचा झरा असून त्यांनी आपल्या कुटुंबीयांसह नातेवाईकांमध्येही आनंद निर्माण केला आहे. मामींनी समाजात अनेक माणसे जोडली. त्यांनी मानलेल्या अनेक लेकी या कार्यक्रमात आल्या आहेत. मामींनी अध्यात्म, प्रपंच, सामाजिक कार्य, संस्था, शेती अशा सर्वच क्षेत्रात काम केले आहे. सौ.सुलभाताई दिघे म्हणाल्या की, इतरांचा आनंद हा आपला आनंद मानून सर्वांनी काम केल्याने आनंदी समाज निर्माण होतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संगमनेर तालुका होय.

यावेळी विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या या पुस्तकाचे शब्दांकन सौ.वैशाली कुलकर्णी यांनी केले असून कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.दुर्गाताई तांबे यांनी केले तर संजय दिघे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here