संगमनेरात प्रवरा नदीला पांढऱ्या फेसाची चादर

0
144

युवावार्ता (प्रतिनिधी)
उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणातून दोन दिवसांपूर्वी शेती व पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. हे पाणी शुक्रवारी संगमनेर शहरात दाखल होऊन पुढील प्रवासासाठी प्रवरा नदीतून वाहू लागले. मात्र या पाण्याचे स्वरूप पूर्णतः बदललेले दिसून आले असून संपूर्ण नदीपात्रावर मोठ्या प्रमाणात पांढरा फेस तरंगताना आढळून आला आहे. त्यामुळे प्रवरा नदीच्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
संगमनेर तालुक्यातील जोर्वे परिसरात नदीवर मोठ्या प्रमाणात फेस साचल्याने जणू काही संपूर्ण नदीवर बर्फाची चादर पसरली आहे, असा भास होत आहे. भंडारदरा तसेच निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर आजवर कधीही अशा प्रकारे फेसाळलेले पाणी किंवा पांढरा द्रव नदीवर तरंगताना दिसून आलेला नाही. मात्र यावेळी पाण्याचा रंग, वास आणि स्वरूप पाहता नदीत मोठ्या प्रमाणावर सांडपाणी, रासायनिक घटकयुक्त पाणी व दूषित स्राव मिसळल्याची शक्यता बळावली आहे.

या फेसाळलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पशुपक्ष्यांचे आरोग्य, शेतीसाठी वापरले जाणारे पाणी तसेच मानवी आरोग्य यावर गंभीर धोका निर्माण झाला आहे. अनेक शेतकरी प्रवरा नदीच्या पाण्यावर अवलंबून असून या दूषित पाण्याचा थेट परिणाम पिकांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, संगमनेर शहरातील एसटीपी (सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प) अद्यापही पूर्णत्वास गेलेला नाही. परिणामी शहरातील घरगुती सांडपाणी थेट प्रवरा नदीपात्रात सोडले जात आहे. यासोबतच औद्योगिक आस्थापना, कारखाने, कत्तलखाने यांचे सांडपाणी देखील याच नदीत मिसळत असल्याची चर्चा असून या सगळ्या कारणांमुळे प्रवरा नदीचा श्वास घुसमटत चालल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

नदीवरील फेस पाहून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने याची दखल घ्यावी, फेसाळलेल्या पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत आणि त्याचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी जोरदार मागणी होत आहे. तसेच दोषी आढळणार्‍या घटकांवर कडक कारवाई करण्याचीही अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
एकीकडे प्रवरा नदीला जिल्ह्याची जीवनवाहिनी मानले जाते, तर दुसरीकडे वाढते प्रदूषण नदीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. प्रशासनाने वेळीच ठोस पावले उचलली नाहीत, तर भविष्यात या नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेले हजारो नागरिक, शेतकरी आणि पशुधन मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here