वाळू तस्करीतून पैसा, या पैशातून राजकारण व दादागिरी करणार्या मोठ्या वाळूतस्करांवर कारवाई कधी ?
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – महसूल व पोलीस प्रशासन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त असताना संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये नदीपात्रातून वाळू उपशासाठी वाळू तस्करांची जणू स्पर्धा सुरू असल्याचे दिसत होते. वाळु तस्करांनी नदीपात्रात धुमाकूळ घालून हजारो ब्रास वाळू लंपास केली आहे.संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीवर आश्वी बुद्रुक व आश्वी खुर्दला जोडणारा कोल्हापुर टाईप बंधारा असुन पुर्व दिशेला हाकेच्या अंतरावर वाळु तस्करांनी अवैध रित्या जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन करत मोठ मोठे वाळुचे डेपोच सुरु केले आहे. शासकीय वाळु डेपोप्रमाणे नदीपात्रात मोठमोठे खड्डे घेत वाळुचे मोठ मोठे डोंगर उभारण्यात आले आहे. सूर्यास्तानंतर वाळु उपश्याला बंदी असताना हा खेळ मात्र सुर्यास्तानंतरच सुरू होतो. महसुल व पोलीस प्रशासनातील काही कर्मचार्यांकडून अधिकार्यांची गस्तीची आधीच माहीती मिळत असल्याने या तस्करांवर कारवाई होत नाही.
काही स्थानिक पुढारी व काही शासकीय कर्मचार्यांशी संगनमताने अव्वाच्या सव्वा किमंतीत चोरुन वाळू पुरवठा करुन हे वाळूतस्कर नागरिकांची लूट करत आहेत. या वाळुच्या चोरीमुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसुल बुडत आहे. स्थानिक नागरीक वाळू तस्करांवर व स्थानिक अधिकार्यांवर नाराज आहेत. वाळू तस्करीतून पैसा, या पैशातून राजकारण व दादागिरी करणार्या मोठ्या वाळूतस्करांवर कारवाई कधी होणार ? याकडे नागरीकाचे लक्ष लागले असून संगमनेरच्या महसूल प्रशासनाने प्रवरा नदीपात्रालगत असलेल्या या गावांमध्ये गस्त वाढवून वाळू तस्कराच्या मुसक्या आवळणे गरजेचे असल्याची मागणी स्थानिक नागरीकातून जोर धरु लागली आहे. नदीपात्रालगतचे काही शेतकरी या वाळुतस्करांना रस्ते उपलब्ध करुन देत त्या बदल्यात मोठ्या प्रमाणात पैसे घेतात असे रस्ते महसुल विभागाने बंद केल्यास वाळु तस्करीला आळा बसेल, असे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.