हरित वसुंधरा अभियानाचे जनक; कारेश्वराच्या टेकडीवर फुलणार जंगल
उद्या मंगळवारी (ता.6) उद्योजक मनीष मालपाणी यांच्या वाढदिवसानिमित्त धांदरफळ शिवारातील कारेश्वर महादेवाच्या डोंगरावर 51 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून संगमनेरकरांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून पर्यावरण संवर्धनाच्या या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन स्वदेश सेवाभावी सामाजिक संस्थेचे संस्थापक बाळासाहेब देशमाने यांनी केले आहे.
संगमनेर युवावार्ता (प्रतिनिधी) सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक मनीष मालपाणी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कारेश्वर महादेवाच्या टेकडीला ‘हरित’ करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी मंगळवारी (ता.6) संगमनेर उपवनविभागाच्या सहकार्याने व धांदरफळ ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागातून या टेकडीवर विविध प्रकारच्या 51 हजार वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. या संकल्पपूर्ती सोहळ्याला माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात,आमदार सत्यजीत तांबे व उद्योगपती राजेश मालपाणी यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हरित वसुंधरेचे स्वप्न मनात बाळगून उद्योजक मनीष मालपाणी गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी आपल्या वाढदिवशी तालुक्यातील एखाद्या ठिकाणाची निवड करुन वृक्षारोपणाचा संकल्प करतात. यापूर्वी त्यांनी शहर व परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणांसह सायखिंडी, वेल्हाळे, खांडेश्वर येथील टेकड्यांवर सुनियोजित पद्धतीने लाखों झाडे लावली असून वर्षभर त्यांचे संगोपन व्हावे यासाठी लाखों रुपयांचा खर्च करुन ठिबक सिंचनाचीही व्यवस्था केली आहे. त्याचा परिणाम संगमनेर तालुक्यातील या तिनही टेकड्या विविध प्रकारच्या वनराजीने नटल्या असून त्यांच्या सौंदर्यातही मोठी भर पडली आहे. यावर्षीच्या वाढदिवसाला त्यांनी धांदरफळ शिवारातील कारेश्वर महादेवाचा डोंगर निवडला आहे. अतिशय विस्तीर्ण असलेल्या या डोंगरावर वड, पिंपळ, जांभूळ, लिंब यासह वेगवेगळ्या शेकडों प्रकारची 51 हजार झाडे लावण्याचा संकल्प त्यांनी केला होता. त्याच्या पूर्ततेसाठी गेल्याकाही दिवसांपासून या डोंगरावरील लागवड योग्य ठिकाणांवर संगमनेर उपवनविभागाच्या सहकार्याने खड्डे घेण्यात आहेत. त्यासोबतच पावसाळ्यानंतरच्या कालावधीतही या झाडांना नियमितपणे पाणी मिळावे व त्यांची वाढ होत रहावी यासाठी ठिबक सिंचनाचीही व्यवस्था केली जात आहे.
मंगळवारी (ता.6) सकाळी 9 वाजता माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजीत तांबे, मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, डॉ.जयश्री थोरात, डॉ.संजय मालपाणी, गिरीश मालपाणी, आशिष मालपाणी, प्रांताधिकारी शैलेश हिंगे, सहाय्यक वनसंरक्षक संदीप पाटील, तहसीलदार धिरज मांजरे, वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदारे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, इंद्रजीत थोरात, रामहरी कातोरे, धांदरफळच्या सरपंच उज्ज्वला देशमाने, वडगाव लांडगा येथील सरपंच दत्तात्रय रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा संकल्पपूर्ती सोहळा पार पडणार आहे.
संगमनेरकरांमध्ये निसर्गाबाबत प्रेम निर्माण व्हावे, वृक्षांचे महत्त्व पटावे यासाठी मनीष मालपाणी यांनी हरित वसुंधरा अभियानाची सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी आपल्या शेतात रोपबँक तयार केली असून त्यात वेगवेगळ्या जातीची हजारों झाडे तयार करुन ती दरवर्षी विविध स्वयंसेवी व सामाजिक संस्था, ग्रामपंचायती व नागरिकांना विनामूल्य दिली जातात. आजवर त्यांच्या रोपबँकमधून सात लाखांहून अधिक झाडांची रोपं वितरित करण्यात आली असून त्यांनी स्वतः ‘वृक्ष आपल्या दारी’ या अभियानातून संगमनेर शहर व उपनगरात हजारों झाडांचे रोपण केले आहे. या शिवाय खांडगावचा वन ट्री डोंगर, सायखिंडी व वेल्हाळे शिवारातील देवाचे डोंगर अशा कितीतरी ठिकाणी त्यांनी झाडांच्या रोपणासह त्यांच्या संवर्धनासाठी लाखों रुपयांचा खर्च करुन ठिबक सिंचन योजनाही कार्यान्वित केल्या आहेत. त्यामुळेच तालुक्यात त्यांना हरित वसुंधरेचे जनक म्हणून ओळखले जाते.