
शहराच्या मध्यभागी व त्यातही सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या समोरच महामार्गावर मागील अनेक दिवसांपासून एक मोठा खड्डा वाळू आणि बॅरिकेटने झाकून ठेवला आहे. परंतून त्यामुळे अपघाताला निमंत्रण देखील मिळत आहे.
पंधरा दिवसांनंतर देखील साहेबांचे लक्ष नाही
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनागोंदी कारभाराबाबत नेहमीच अनेक वाद असतात. गुळगुळीत रस्त्यावर खड्डे आणि चुकीचे गतिरोधक अनेक वेळा अपघाताला निमंत्रण देतात. अनेक जण जायबंदी होऊन किंवा अनेकांचे बळी जाऊन देखील या विभागाला जाग येत नाही. आता तर चक्क या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या साहेबांच्या कार्यालयासमोरच महामार्गावर एक मोठा खड्डा पडला आहे. मात्र त्यावर तात्पुरती मलमपट्टी म्हणून एक अडथळा उभा ठेवून अपघात रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने आलेल्या वाहनाचा रस्त्याच्या मधोमध ठेवलेल्या याच अडथळ्याला धडकून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र याकडे याच सार्वजनिक विभागाचे लक्ष नाही.

रस्ते, महामार्ग याची निर्मिती आणि देखभाल करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे असते. किंवा त्यांच्या देखरेखीखाली हे रस्ते तयार होत असतात. परंतु अनेक वेळा त्यात अनेक त्रुटी किंवा चुकीच्या कामामुळे रस्ते मुदतीआधी खराब होतात. दरम्यान संगमनेर शहरात पंधरा दिवसापूर्वी तुफान पाऊस झाला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागासमोरच नाशिक पुणे महामार्गावर मोठा खड्डा पडला होता. हा धोकादायक खड्डा तात्काळ बुजविला जाईल अशी वाहनचालकांना खात्री होती. परंतु अगदी कार्यालयाच्या समोरच दिसणारा हा खड्डा पंधरा दिवसानंतर देखील या अधिकार्यांना दुरूस्त करता आला नाही त्यामुळे गाव खेड्यातील रस्ते कधी दुरूस्ती करीत असतील असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. मोठ-मोठे महामार्ग बांधणारे व अडवळणाचे कठीण रस्ते तयार करणारे सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र रस्त्यातील समस्यांकडे कायमच दुर्लक्ष करीत असतात. या दुर्लक्षामुळेच अनेक अपघात आणि जिवीतहानी होत असते. मात्र त्याचे कोणतेही सोयर सुतक या विभागाला नसते. अपघाताला निमंत्रण देणारा खड्डा कधी बुजविणार व त्यावर उभे करण्यात आलेले अटकाव कधी हटविणार असा प्रश्न वाहनधारक करीत आहेत.






















