कै. गंगुबाई लक्ष्मण आहेर यांना भावपूर्ण श्रध्दांजली !
अष्टपूत्रा सौभाग्यवती…..
संस्कारांचा अभाव आणि बक्कळ वाढणाऱ्या लोकसंख्येचे भान ठेवून आजच्या जमान्यात मुलीच्या विवाहप्रसंगी ब्राह्मण तिला “ईष्टपूत्र सौभाग्यवती भव ” असा आशिर्वाद देतात. परंतू पूर्वीच्या काळी ऋषिमूनी आणि साधुसंत देव, देश, धर्माचे रक्षण करण्याकरता आणि आपला संसार – शेतीचा समर्थपणे सांभाळ करण्यासाठी सक्षम संततीची आवश्यकता म्हणून लग्नाच्या वेळी नवविवाहितांना “अष्टपूत्र सौभाग्यवती भव” असा आशिर्वाद देत असावेत असे मला वाटते. अशा काळात गत शतकापूर्वी आमची बहिण गंगूबाई हिचा विवाह घारगाव चे लक्ष्मण बापू आहेर यांच्याशी झाला आणि लग्नाच्या वेळी मिळालेला आशिर्वाद घेऊन ती खरोखरच अष्टपूत्र सौभाग्यवती झाली. (गंगूबाई ला ‘बाई” आणि मेव्हणे लक्ष्मणदादांना आम्ही सर्वजण “दादा” म्हणतो). बबूबाई, चांगूनाबाई, मीनाबाई, विमल आणि कमल अशा पाच मुली आणि शांताराम, सुखदेव व सुरेश या तीन मुलांसह आठ भावंडाना बाईने जन्म दिला. त्या काळी एक रूपया किलो बाजरी आणि दोन रूपये किलो गव्हाचा भाव असताना लक्ष्मण दादा धान्याचा व्यापार करण्याकरिता आमच्या गावी वडगाव आनंद ला येत असत आणि त्यानिमित्ताने आमच्या घरी नेहमीच मुक्काम असायचा.
तुटपुंजी शेती आणि साधारण आर्थिक परिस्थितीत देखील शांत संयमी स्वभावाच्या दादांसोबत आमच्या बहिणीचा संसार सुखाने फूलत होता. यथावकाश सर्व मुलींची लग्न होऊन त्या आपआपल्या सासरी रमल्या. मूलांचीही लग्न होऊन शांताराम आणि सुखदेव हे भाजीपाल्याचे व्यापारी होऊन मुंबईत स्थिरावले. सुरेशने मात्र शेतीचा वसा घेऊन गावीच रहाणे पसंत केले आणि शेतीबरोबरच मेडिकल व्यवसाय सांभाळताना समाजसेवेचे जू खांद्यावर घेतले. “मामाचा गाव” हा पूर्वीच्या काळी लहान मुलांना सुट्टीत सापडणारा स्वर्गाचा तुकडा,आता नाहीसा झाला आहे. आम्हाला तर आमचा मामाचा गावच नव्हता. आमचा मामाचा गाव होता बहिणीचा गाव घारगांव. (शिदाईक वस्ती) सुट्टीत किंवा ईतरवेळी देखील आम्ही भावंडे आमच्या घरून निघालो की पायवाटा तुडवत कळमजाईचा डोंगर ओलांडून बोटा मार्गे खंडोबाच्या माळावरून शिदाईकात पोहचत होतो. कधी कधी शेतीसाठी सोबत बैल देखील घेऊन जायचो. तिथे गेल्यावर मिळालेली बहिणीची माया आणि दादांनी पूरवलेले लाड परत परत आम्हाला तिथे जायला आकर्षित करत होते. घारगाव ला वारंवार जाण्यासाठी विशेष आकर्षित होण्याचे आणखी एक कारण म्हणजे आमच्या वडिलांनी आमचे मोठे बंधू तानाजी यांची मुलगी रंजना हिला बाईच्याच पदरात सून म्हणून सोपविली आणि सुरेश सोबत तिचे लग्न लावून देवून आहेर घराण्याशी पाचव्या पिढीची गाठ बांधली. आम्हा सगळ्यांना अभिमान आहे की रंजनाने ती गाठ कधीच सैल होऊ दिली नाही. बाई आणि दादांनीही तिचा सूनेपेक्षा भाची आणि नाती प्रमाणेच सांभाळ केला.
रंजनाने देखील कर्तव्य कठोरतेने शेती आणि संसार सांभाळून खूप माया आणि ममतेने सासू सासऱ्यांची अहोरात्र अविरत सेवा केली. मृदू, मितभाषी आणि सतत समाधानी असणाऱ्या आमच्या बाईला साथ मिळाली तितक्याच तोलामोलाच्या निर्मळ आणि निर्भेळ मनाच्या शांत संयमी दादांची. आम्ही सख्खी लहान भावंडे असूनदेखील आम्ही समोर जाताच डोक्यावरचा पदर सावरून बसणारी आमची बहिण अजूनही डोळ्यांसमोरून हलतच नाही. त्यांना चहा दिला का, ते जेवले का म्हणून वेळोवेळी रंजनाला विचारणारी बाई प्रत्यक्षात कोणालाही नकळत दादांच्या तब्येतीचा कानोसा घेत होती. पण आता ती वेळ सरली आहे. दादाच आता निर्विकार चेहर्याने शून्यात नजर लावून बाईचा शोध घेत आहेत. बाई आणि दादा दोघे एकमेकांचे श्वास आणि निश्वास होते. पण आता एक श्वास थांबला आहे. तो नियतीचा खेळ आहे. सर्वच भावंडांनी आईची अखंड सेवा केली पण बाई आणि दादांची सेवा आणि सांभाळ जरा जास्तच करण्याचं भाग्य सुरेश आणि रंजना या पती पत्नीला लाभलं आणि त्यांनीही सतत तेवणाऱ्या निरांजनाच्या वाती होऊन त्यांचा सांभाळ केला.
नलिनीदलगत जलमतितरलं l
तद्वज्जिवनं अतिशय चपलम् ll
म्हणजे माणसाचं आयुष्य हे अळूच्या पानावर पडलेल्या पावसाच्या थेंबासारखं असतं. तो थेंब पानावरून गळून कधी मातीत मिसळून जाईल सांगता येत नाही. पानावर आहे तोपर्यंत जपणं आपल्या हातात आहे.पण तरीही तो एक दिवस गळून पडणारच आहे हेही एक शाश्वत सत्य आहे. बाई गेली. एक थेंब गळून पडला आहे. आता आवश्यकता आहे दुसर्या थेंबाची काळजी घेण्याची. दादांची सेवा करण्याची, त्यांचा सांभाळ करण्याची. आठही भावंडं आणि त्यांचे कुटुंबीय ती काळजी नक्कीच घेतील आणि पुत्र पौत्रत्वाची जबाबदारी समर्थपणे निभावतील. आपलं सौभाग्य शाबूत ठेवून आणि दादांच्या रूपाने आपलं सौभाग्य लेणं आठही भावंडांच्या खांद्यावर सोपवून ही अष्टपूत्रा अनंतात विलीन होऊन अंतिम सत्याचा शोध घेण्यासाठी निघाली आहे. त्या आमच्या “अष्टपूत्र सौभाग्यवती” बहिणीस आमच्या देवकर कुटुंबियांची भावपूर्ण श्रद्धांजली !
- श्री. तान्हाजी नथू देवकर (भाऊ)
- माजी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर
- श्री. हरिभाऊ नथू देवकर (भाऊ)
- वारकरी सांप्रदायाचे पाईक
- श्री. देवराम नथू देवकर (भाऊ)
- माजी ए.सी.पी., मुंबई