खड्डे, अपघात, मृत्यू – वाहचालकांचा किती अंत बघणार?

टोल प्लाझाची वसुली एकदम मस्त; वाहनचालक त्रस्त

संगमनेर (युवावार्ता प्रतिनिधी) –
नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील आळे फाटा ते संगमनेर, सिन्नर आणि नाशिक रोड हा पट्टा आज नागरिकांसाठी ‘महामार्ग’ नसून ‘खड्डेमार्ग’ ठरला आहे. रस्त्याला डांबर उरलेलं नाही, ठिकठिकाणी खोल गर्तेत रुपांतर झालेल्या खड्ड्यांतून गाडी चालवताना प्रवाशांचा जीव अक्षरशः मुठीत आहे. अपघात, वाहनांचे नुकसान, पाठ-मानेचा त्रास, वाहतूक कोंडी हा प्रवास आता नागरिकांसाठी शाप ठरत आहे.

एका बाजूने रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू आहे. परंतु संथ गतीने चालणार्या कामामुळे दुसर्या बाजूवर संपूर्ण वाहतूक वळवण्यात आली आहे. परिणामी दररोज मोठे अपघात होत आहेत. एका बाजूला अति ताणामुळे खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांत पाणी साचून ते अधिक धोकादायक झाले आहेत. गुंजाळवाडी येथे काही दिवसांपूर्वी कंटेनर पलटी होऊन दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. गोंदे फाट्याजवळील खड्ड्यांमध्ये चारचाकी गाड्यांची चाके निखळून पडत आहेत. रात्री खड्डे दिसत नसल्याने प्रत्येक मिनिटाला अपघाताचा धोका डोळ्यांसमोर उभा राहतो.
वाहनांचे नुकसान इतके प्रचंड होत आहे की चारचाकी गाड्यांना लवकरच मोठे दुरुस्ती काम करावे लागत आहे. पेट्रोल-डिझेलचा खर्च झपाट्याने वाढला असून गाड्यांचे सरासरी (मायलेज) जवळपास निम्मे झाले आहे. दुसरीकडे, सर्व्हिस रोडची अवस्था मुख्य रस्त्यापेक्षा वाईट आहे. संगमनेर एमआयडीसीकडे जाणारे रस्ते पोखरलेले असून उद्योजक, शेतकरी आणि मालवाहतूक करणार्यांना रोजचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. फक्त महामार्गच नाही तर रायतेवाडी-प्रवरा पुलाचा रस्ता दिड वर्षापूर्वी नव्याने झाल्याचा गाजावाजा करण्यात आला होता. पण आज त्याच रस्त्यावर खोल कपारी पडल्याने दुचाकीस्वारांची सुद्धा तारांबळ उडत आहे. दररोज लाखो रुपयांचा टोल वसूल करणार्या कंपनीला प्रवाशांच्या जीवीताशी, वाहनांच्या नुकसानीशी, उद्योग-शेतीच्या अडचणींशी काहीही देणंघेणं नाही. खड्डे बुजविण्याचे थातूर-मातूर काम केले जाते; दोन दिवसांनी तोच खड्डा पुन्हा उघडाच. प्रशासन आणि ठेकेदार कंपनी यांनी डोळ्यांवर पट्टी बांधल्यासारखेच वागणे सुरू ठेवले आहे.

दरम्यान, नाशिक फाटा ते राजगुरुनगर या 28 किलोमीटर उन्नत महामार्गाचा प्रकल्प सरकारने जाहीर केला आहे. अब्जावधींच्या निधीची घोषणा, भूमीअधिग्रहण प्रक्रियेतले टप्पे, प्रगतीच्या गाजावाजा हे सारे कागदावर सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात काम रेंगाळले आहे. घोषणांचा पाऊस पडतो, पण खड्ड्यांत मात्र नागरिकांचे प्राण धोक्यात येत आहेत. ‘रस्ता द्या की टोल थांबवा’ असा संतप्त स्वर आज प्रवाशांच्या तोंडी आहे. लाखो वाहनधारकांकडून टोल वसूल करूनही प्रवास सुरक्षित नसेल, तर हा सरळ-सरळ जीवघेणा गैरव्यवहार आहे. प्रशासन, महामार्ग प्राधिकरण आणि टोल कंपनीने आता तरी जागे व्हावे, अन्यथा नाशिक-पुणे महामार्गावरील खड्डेच सरकारच्या विकास घोषणांना गाडून टाकतील.
डांबरी रस्ता पूर्णपणे उखडला – आळे फाटा ते संगमनेर, सिन्नर, नाशिक फाटा या पट्ट्यात रस्त्याची डांबरी पृष्ठभाग पूर्ण उखडल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे काँक्रिटीकरणाचे काम सुरू केले असले तरी एकाच बाजूने वाहतूक वळवल्याने अपघातांची संख्या प्रचंड वाढली आहे.

वाहतूकदारांचा जीव धोक्यात – दुचाकी, चारचाकी, ट्रक, कंटेनर, मालवाहतूक गाड्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा आहे. त्यात बेशिस्त व नशेत असलेले चालक आणखी धोका निर्माण करत आहेत. प्रवास म्हणजे अक्षरशः जीव मुठीत धरून केलेली कसरत झाली आहे.
सर्व्हिस रोडही उध्वस्त – मुख्य रस्त्यालगत अनेक ठिकाणी तयार करण्यात आलेले सर्व्हिस रोड उखडले गेले आहे. पावसामुळे तर या रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था आहे.
पावसामुळे खड्डे अजून खोल – यंदाचा पावसाचा रेटा जास्त असल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. अनेक खड्डे इतके खोल झाले आहेत की वाहनं आदळून उलटण्याचा धोका वाढला आहे.
आरोग्यावर परिणाम – प्रवासादरम्यान खड्ड्यांच्या धक्क्यांमुळे प्रवाशांना मान, पाठ, मणका आणि कमरेच्या विकारांचा त्रास वाढत आहे.
कामं रेंगाळलेली – काही ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम अनेक महिने सुरू आहे, पण गती मात्र कासवाच्याही संथ गतीपेक्षा कमी आहे. हे काम करत असताना दुसर्या बाजूला अपघात रोखण्यासाठी किंवा वाहतूक सुरळित करण्यासाठी पुरेशी खबरदारी देखील घेतली जात नाही.
संगमनेर चखऊउ रस्तेही बिकट – संगमनेर औद्योगिक वसाहतीकडे जाणारे रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. या ठिकाणी ओव्हरब्रीज चे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. या कामामुळे केवळ वाहनचालकांनाच नाही तर आजूबाजूच्या नागरिकांना, शेतकर्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. उद्योजक व मालवाहतूक गाड्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गोंदे फाटा – नांदूर शिंगोटे प्रचंड खड्डे – गोंदे फाटा, नांदूर परिसरात एवढे खोल खड्डे आहेत की चारचाकी गाड्यांची चाकेच निखळून पडत आहेत. नांदूर शिंगोटे येथे फ्लायओव्हरचे काम देखील अतिशय संथ गतीने सुरू असल्याने याठिकाणी तासन्तास वाहतूक ठप्प होते.
रात्रीच्या वेळी भीषण अपघात – रात्री खड्डे दिसत नाहीत, दिवे नाहीत, चेतावणी चिन्ह नाहीत. दररोज भीषण अपघात घडत आहेत. आत्तापर्यंत या महामार्गावर शेकडो अपघात, अनेकांचा मृत्यू आणि अनेकजण जायबंदी झाले आहेत.
टोल मात्र कायम – हिवरगाव पावसा टोल नाका हा वादग्रस्त टोल नाका असून अनेक वेळा येथे हाणामार्या, आंदोलने झाली आहेत मात्र निर्ढावलेपणा कायम आहे. एवढ्या वाईट अवस्थेतही टोल प्लाझावर वाहनचालकांकडून भरमसाठ रक्कम वसूल केली जात आहे. नागरिक विचारतात – टोल घेताय तर चांगला रस्ता का नाही? असा प्रश्न कायम आहे.

नागरिकांची मागणी
टोल कंपनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तात्काळ जबाबदारी स्वीकारून खड्डे बुजवावेत. अपघात टाळण्यासाठी रात्री रिफ्लेक्टर, चेतावणी बोर्ड, योग्य लाइटिंग लावावे. चंदनापुरी ते सिन्नर परिसरातील खड्डे तातडीने बुजवावेत. जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल आकारू नये. संथ गतीने सुरू असलेली कामे, ओव्हरब्रीज ठरावीक वेळेत पूर्ण करावीत. सरकारने केवळ घोषणा न करता नाशिक फाटा ते राजगुरुनगर उन्नतीकरण प्रकल्प वेळेत पूर्ण करावा.