बलात्कार लपवण्यासाठी पीडितेला धमक्या; पाच जणांविरुद्ध गुन्हा

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – तालुक्यातील एका गावात नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. चुलत आजोबानेच आपल्या अल्पवयीन नातीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, पीडित मुलगी सध्या पाच महिन्यांची गर्भवती आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी अकोले तालुक्यातील एका विद्यालयात शिक्षण घेत असून, जानेवारी महिन्यात तिचे आई-वडील लग्नकार्याकरिता बाहेरगावी गेले असताना ती घरात एकटी होती. त्या वेळी चुलत आजोबा पंडित वैराट याने तहान लागल्याचे सांगत घरात प्रवेश केला. दरवाजा आतून बंद करून त्याने तिच्यावर तीन वेळा जबरदस्तीने अत्याचार केला.
घटनेनंतर मानसिक व शारीरिक वेदनेत असलेल्या मुलीने ही बाब आरोपीच्या पत्नी संगीता वैराट हिला सांगितली. मात्र, तिने उलट पीडितेला धमकी दिली की, जे झालं ते विसर, नाहीतर तुला आणि तुझ्या वडिलांना जिवंत ठेवणार नाही. त्यामुळे ही घटना काही काळ गुपित राहिली. मात्र पोटदुखीच्या तक्रारीनंतर पीडितेला आरोग्य तपासणीसाठी धांदरफळ आरोग्य केंद्रात व नंतर संगमनेर येथे नेण्यात आले. तिथे सोनोग्राफीमध्ये तिची पाच महिन्यांची गर्भधारणा उघड झाली. वडिलांनी तिला विश्वासात घेतल्यानंतर तिने सर्व कथन केले. या प्रकारानंतर पंडित वैराट, संगीता वैराट, संग्राम ऊर्फ शेरू वैराट, माधुरी वैराट यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.