समाजसेवेसाठी माध्यम म्हणून निवडणुकीच्या रिंगणात – मिलिंद अभंग

0
308

संगमनेर (प्रतिनिधी)-
व्यवसाय करणे ही आपली जबाबदारी असते, पण समाजाशी असलेली नाळ जपणे ही आपली खरी ओळख असते, असे प्रतिपादन प्रभाग क्रमांक तीन मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मिलिंद बाबूराव अभंग यांनी केले.
अभंग म्हणाले, सामान्य नागरिकांमध्ये राहून, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत समाजासाठी जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न नेहमी केला. पण नागरिकांच्या अपेक्षा वाढत गेल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी शासन व्यवस्थेत प्रवेश करणे आवश्यक झाले. निवडणूक हेच त्यासाठीचे सक्षम माध्यम आहे.

फॅब्रिकेशन व्यवसायाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग तीन व परिसरातील प्रत्येक घटकांशी संपर्कात राहून सेवा करण्याचे काम त्यांनी केले. कोणतेही पद नसतानाही प्रभागातील अडचणी सोडवण्यासाठी सतत सत्ताधारी पदाधिकार्‍यांचा पाठपुरावा करून अनेक प्रश्न मार्गी लावले. सार्वजनिक उपक्रम, धार्मिक सप्ताह, सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये पुढाकार घेऊन प्रत्येक कुटुंबाशी नाळ जुळवत विश्वास संपादन केला.
नगरपालिकेत जाऊन नागरिकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी ठोस कार्ययोजना राबवणे हा माझा उद्देश आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सेवा समितीकडून उमेदवारीची अपेक्षा असताना तांत्रिक कारणांमुळे अडचण निर्माण झाली तरी नागरिकांच्या प्रेमाखातर, आग्रहाखातर अखेरीस अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
प्रचारादरम्यान मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, नागरिकांचा प्रचंड पाठिंबा आणि प्रेम पाहता या निवडणुकीत निश्चितच यश मिळेल, असा ठाम विश्वास अभंग यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here