म्हाळुंगी नदीवरील नवा पूल लवकरच पूर्ण होणार

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शहराला व परिसरातील गावांना जोडणार्या अत्यंत महत्त्वाच्या म्हाळुंगी नदीवरील नव्या पुलाच्या कामाची पाहणी आमदार अमोल खताळ यांनी बुधवारी केली. या पुलाचे काम लवकर पूर्ण करून नागरिकांसाठी तो लवकरात लवकर खुला करण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या पुलाची प्रतीक्षा गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिक करत असून, वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार खताळ यांनी स्वतः भेट देत पुलाच्या कामाचा आढावा घेतला.

त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, ठेकेदार, आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते. आमदार खताळ यांनी पुलाच्या उर्वरित कामात वेग आणण्याच्या सूचना देत, कामाच्या गुणवत्तेचीही कसून पाहणी केली.
हा पूल संपूर्ण शहरातील साई नगर, पपिंगस्टेशन परिसरासाठी तसेच नदीकाठी फिरण्यासाठी येणार्या नागरीकांना, येथील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून वाहतूकीसाठी तो लवकर खुला करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
