महायुतीच्या 45+ ला सर्वसामान्यांच्या मतांचा अडसर

0
1240

पक्ष फोडाफोडीमुळे व ईडीच्या कारवायांमुळे जनतेमध्ये नाराजी ?

शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन मोठे पक्ष फोडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – महाराष्ट्रात सध्या अनेक गोष्टींमुळे व राजकीय उलथापालथ झाल्यामुळे येणार्‍या लोकसभेला कोण बाजी मारतो, कोण बहुमत घेतो याच्या केवळ सध्या चर्चा सुरु आहेत. निवडणुकीवर अनेक गोष्टी परिणाम करणार आहेत. त्यातील एक महत्वाचा फॅक्टर म्हणजे पक्ष फोड.. कारण शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन मोठे पक्ष फोडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे.
सध्या महाराष्ट्रात भाजपा आणि काँग्रेस यांच्या व्यतिरिक्त आता महाराष्ट्रात दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे व जोडीला वंचित बहुजन आघाडी असे पक्ष आहेत. त्यामुळे आता आगामी निवडणुकात नेमके काय होऊ शकते? कोण बहुमत घेऊ शकतो? सध्या भाजप महाराष्ट्रात 45 प्लस जागा घेऊ असे म्हणत आहे. तर भाजपला खरोखर तितके यश मिळेल हे पहाणे महत्त्वाचे आहे. सध्या काही चॅनेल, काही एजन्सीसने सर्व्हे केला. त्या सर्व्हेतून मतदारांच्या काही भूमिका समोर आल्या. यातून असे दिसून आले की, महाराष्ट्रात गेल्या दोन-तीन वर्षात जो काही राजकीय गोंधळ झाला आहे ते पाहून सर्वसामान्य मतदार वैतागलेला आहे. त्यांची मतदानासाठी जाण्याची इच्छाच नाही असेही दिसून आले आहे. भ्रष्टाचार करणार्‍यांना पक्षात कसे घेतले जाते? ज्यांना भ्रष्टाचारी भ्रष्टचारी म्हटले तेच नेते तिकडे मंत्री झाले. हे न कळण्याइतपत जनता वेडी नाही असेही काहींनी मत मांडले आहेत. भ्रष्टाचारी नेते तिकडं गेले आणि सर्व मंत्री झाले. हे सर्व कसं घडते. लोकांना सर्वकाही कळते अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.


महाराष्ट्राच्या राजकारणात सहानुभूती हा एक मोठा फॅक्टर आहे. दरम्यान आता राष्ट्रवादी व शिवसेना हे पक्ष फुटल्याने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ‘सहानुभूतीची लाट’ आहे असे म्हटले जातं आहे. पक्ष फोडाफोडीमुळे व ईडीच्या कारवायांमुळे जनतेमध्ये नाराजी असल्याचे दिसते. या फॅक्टरचा तोटा भाजपला होऊ शकतो असे म्हटले जात आहे. अंतरवाली सराटीतून सुरु झालेले व त्यातंर महाराष्ट्र्भर व्यापून निघालेले मनोज-जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठीचे आंदोलनामुळे व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न मिळाल्यामुळे मराठा समाज नाराज असल्याचे बोलले जात आहे. बेरोजगारी आणि छोट्या शेतजमिनी असल्यानं उदरनिर्वाह करणे कठीण झाले असल्याने किमान आरक्षण भेटले तर मुलाबाळांना याचा फायदा होईल. त्यामुळे आरक्षण गरजेचेच असल्याचे अनेकांना वाटते. यातील काही मतदारांना कोणाला मतदान करणार असे विचारल्यावर त्यांनी सांगितले की, मनोज जरांगे जे सांगतील तेच आम्ही करू असे ते सांगतात. म्हणजेच हा देखील एक फॅक्टर या निवडणुकीत काम करेल असे दिसते.
महाराष्ट्रात 48 लोकसभा जागांपैकी एका सर्व्हेनं महायुतीला 41 हे तर दुसर्‍या एका सर्व्हेनं 37 जागा मिळतील असे वर्तवले आहे. तर काही सर्वेनुसार हा आकडा अगदी 20 दाखवला. या निवडणुकीत एकीकडे शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यासमोर सर्वसामान्य नागरिकांमध्ये आपली बाजू मांडणे व सहानुभूतीचे मतात परिवर्तन करणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे मागील वेळी शिवसेनेची पूर्ण ताकद भाजपसोबत होती. ती आता विभागली गेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मागे जर शिवसैनिक एकवटून उभा राहिला तर भाजपच्या मतांच्या टक्केवारीत घसरण होऊ शकते असाही एक मतप्रवाह आहेतर काही लोक सांगतात की सुरूवातीला उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असणारी सहानुभुती कमी झाली असून लोकांना मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) चोवीस तास काम करत असल्याचे दिसू लागले. लोकांना वाटतं आहे की ते काम करत असल्याचे दिसत असून काही निर्णय चांगले झाल्याने लोक त्यांच्या पाठीशी आहेत असाही एक मतप्रवाह आहे. ग्रामीण भागात भाजपाबद्दल नाराजी दिसून येत असल्याचे चित्र आहे. बेरोजगारी, महागाई, शेतकर्‍यांच्या समस्या, शेतमालाचे भाव आदींमुळे नाराजगी आहे. तसेच पक्ष फोडणं चुकीचं असून ज्यांचा पक्ष होता त्यांच्याकडून तो हिसकावून घेण्यात आल्याची गोष्ट लोकांना खटकली आहे. यात कळस म्हणजे पवार विरुद्ध पवार अशी देखील फाईट लावल्याने इथं स्वत:च्या ताकदीवर जिंकू शकत नाहीत त्यामुळे सर्वकाही सुरळीत असणार्‍या तुम्ही इथं स्वत:च्या ताकदीवर जिंकू शकत नसल्याचेच तुमच्या लक्षात आल्याने फूट पाडण्यात आली असे लोक म्हणतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here