अब्जावधींचा खर्च, तरीही महामार्गावर मृत्यूचे सापळे

विकासाच्या गप्पांविरुद्ध जनतेचा आक्रोश –
सरकारचे मंत्री, खासदार, आमदार वारंवार दौरे करतात, फित कापतात, आश्वासनांचा वर्षाव करतात, पण प्रत्यक्षात रस्त्यावरील खड्डे आणि अपघातांची मालिका थांबत नाही. सात महिन्यांत 70 बळी ही आकडेवारी कोणत्याही सुसंस्कृत व्यवस्थेसाठी लज्जास्पद आहे. त्यामुळे सामान्य नागरिक शासन आणि प्रशासनाला प्रश्न विचारतोय की, आमचा जीव खरच इतका स्वस्त झाला काय ?

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – राज्य सरकार ‘विकास’, ‘प्रगती’ आणि ‘सुशासन’च्या मोठमोठ्या गप्पा मारत असताना, वास्तव मात्र अगदी भयावह आहे. संगमनेर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख महामार्गांचा आजचा चेहरा पाहिला, तर हे रस्ते विकासाचे द्योतक नव्हे तर मृत्यूचे सापळे बनले असल्याचे दिसते.
नगर-मनमाड महामार्गावर झालेला तब्बल कोट्यावधी रुपयांचा खर्च अक्षरशः पाण्यात गेला आहे. रस्त्यावरील उखडलेला डांबरातील खड्डे आणि धोकादायक वळणांमुळे हे मार्ग नागरिकांसाठी ‘यमराजाचा महामार्ग’ ठरले आहे. पुणे-नाशिक महामार्गाचे काम शेकडो कोटी खर्चूनही वर्षानुवर्षे अपूर्ण आहे. या रस्त्यावर शेकडो नागरिकांनी आपले प्राण गमावले, असंख्य जण कायमचे अपंग झाले, तरीही शासन आणि प्रशासन डोळेझाक करत बसले आहे.
नगर-मनमाड महामार्गावर गेल्या काही वर्षांत तब्बल 4897 अपघातांची नोंद झाली असून त्यापैकी 2113 अपघात भीषण स्वरूपाचे होते. फक्त जानेवारी ते जुलै 2025 या सात महिन्यांतच 142 अपघात आणि 70 मृत्यू झाले आहेत.

शिर्डी-अहमदनगर मार्गाचीही अवस्था वेगळी नाही. अडीच वर्षांत 302 अपघातांत 322 जणांचा मृत्यू, तर 2019 पासून आतापर्यंत 423 साईभक्तांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी केवळ आकडे नाहीत, तर सरकारच्या निष्क्रियतेची आणि भ्रष्ट व्यवस्थेची साक्ष देणारी शोकांतिका आहे. या महामार्गांच्या बांधकामावर झालेला प्रचंड खर्च, दर्जाहीन साहित्य, आणि निकृष्ट कामांमुळे सरकारचा विकास हा शब्दच उपहासात्मक झाला आहे. ठेकेदार, अधिकारी आणि काही राजकीय नेते यांच्या साटेलोट्याने लोकांच्या जीवावर उठलेली ही भ्रष्ट यंत्रणा आज सर्वात मोठा धोका ठरत आहे.
संगमनेर शहर व तालुक्यातील रस्त्यांची देखील मोठी चाळण झाली आहे. संगमनेर ते कोपरगावकडे जाणारा रस्ता देखील ठिकठिकाणी उखाडला आहे. रस्त्यात खड्डे आणि साचलेले पाणी यामुळे हा रस्ता खड्डेमार्ग बनवून मृत्यूचा सापळा तयार झाला आहे. या रस्त्याची इतकी बिकट अवस्था झाली आहे की, याला रस्ता म्हणावा कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे. नविन बनविण्यात येणारे रस्ते देखील काही काळातच उखडले जात आहे. हे कशाचे द्योतक आहे. ठेकेदार पोसणे आणि भ्रष्टाचार करणे या एक कलमी कार्यक्रमातून अनेक रस्त्यांची निर्मिती, डागडुजी, काँक्रेटीकरण आणि डांबरीकण केले जाते. मुदती अगोदर रस्ते उखडले तर त्यासाठी ठेकेदाराला जबाबदार धरले जाते परंतू भ्रष्ट यंत्रणा ठेकेदारास जाब विचारत नाही. त्यामुळे या ठेकेदारांची हिंमत वाढली असून मयताच्या टाळूवरील लोणी खाल्ल्याचा हा प्रकार आहे. सत्ता कुणाचीही असो हा भ्रष्टाचार आणि बेजबाबदारपणा संपत नाही. देशात सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होत असतात. मात्र अजूनही सरकार याकडे गांभीर्याने पहात नाही.

दुरुस्तीचे काम केवळ फाईलमध्ये दाखवले जाते, प्रत्यक्षात मात्र रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसतात. वर्षानुवर्षे निधी खर्च होत आहे पण नागरिकांच्या जीविताचे रक्षण होत नाही. हा शासन यंत्रणेच्या निष्क्रियतेचा आणि भ्रष्टाचाराचा सर्वोच्च नमुना आहे. जनतेने आता आवाज उठवण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन रस्त्यांची दुरुस्ती, अपघात नियंत्रण आणि सुरक्षिततेसाठी ठोस आणि वेळेत पाऊल उचलत नाहीत, तोपर्यंत हे मृत्यूचे सत्र थांबणार नाही. रस्ते हे प्रगतीचे प्रतीक असतात, पण महाराष्ट्रातील अनेक रस्ते आज मृत्यूचे सापळे बनले आहेत. सरकार अजूनही कागदी घोडे नाचवत बसले आहे; मात्र आता जनतेने स्वतःच्या जीविताच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. तो रस्ता मात्र भ्रष्टाचार मुक्त व खड्डेमुक्त असला पाहिजे.






















