विद्युत वितरण कंपनीने झाडांची केली बेछुट कत्तल

0
387

उघड्या डीपी, क्षमतेपेक्षा जास्त लोड, मेंटेनन्सची दिरंगाई

ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांमध्ये संताप

युवावार्ता (संगमनेर प्रतिनिधी)-
संगमनेर ही संतांची, साहित्यीकांची, समाजकार्याची भूमी आहे. तितकीच ही हिरव्या वनराईचीही भूमी आहे. शहरालगतच्या पावबाकी रोड, मालदाड रोड, औद्योगिक वसाहतीसह विविध भागांमध्ये सामाजिक संघटना व पर्यावरणप्रेमी नागरिकांनी झाडे लावून हिरवाई फुलवली. मात्र आता या हिरवाईवर महावितरण कंपनीच्या निष्काळजी व अराजक कारभाराने कुर्‍हाड चालवली आहे. मेंटेनन्सच्या नावाखाली झाडांची बेछुट कत्तल सुरू असून नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.

झाडे लावा-झाडे जगवा, पण महावितरणचा बेफिकीरपणा
पावसाळ्यात झाडांच्या फांद्या तारांना लागून स्पार्क होणे वा डीपी ट्रिप होणे टाळण्यासाठी झाडांच्या फांद्या छाटणे गरजेचे असते. मात्र, महावितरणच्या कर्मचार्यां नी फांद्या कापण्याऐवजी झाडांच्या खोडांनाच कुर्‍हाड लावण्याचा सोपा मार्ग स्वीकारला. फांद्या छाटण्यासाठी साधनं उपलब्ध नसल्याने झाडे बोडकी करून टाकण्याची पद्धत अंगीकारली गेली. परिणामी पावबाकी रोड व मालदाड रोडसारख्या हिरवाईने नटलेल्या भागांचा चेहरामोहरा बदलला. पहाटे मॉर्निंग वॉकला जाणार्‍यांना ज्या रस्त्यावर चालताना फॉरेनमधील हिरवाईची जाणीव व्हायची, तोच रस्ता आता बकाल व निर्जीव दिसू लागला आहे.

परवानगीशिवाय झाडांची कत्तल?
शहरात अनेक ठिकाणी मृतप्राय झाडे असून, त्यांना कापण्यासाठी नागरिक विनंती करत आहेत. मात्र खावटीची अपेक्षा असल्याने परवानगी दिली जात नाही, असा आरोप नागरिक करत आहेत. उलट, जिथे हिरवीगार झाडे व्यवस्थित उभी होती तिथेच झाडांची कत्तल सुरू झाली आहे. नगरपरिषदेची रितसर परवानगी न घेता हे सर्व घडत आहे का? हा गंभीर प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

शनिवारी मेंटेनन्सची नवी पद्धत
महावितरणने अलीकडे संगमनेरमध्ये शनिवारी दिवसभर वीज बंद ठेवून मेंटेनन्स करण्याची वेगळीच पद्धत सुरू केली आहे. यामुळे व्यावसायिक वर्ग त्रस्त झाला आहे. अनेक दुकानदार, उद्योगपती दिवसभर जनरेटरवर अवलंबून राहत आहेत. एकाच दिवशी एकत्रित देखभाल न करता वारंवार वीज खंडीत होण्यामध्ये कारभारातील कुचराई आहे, असा आरोप होत आहे.

उघडी डीपी, जीव धोक्यात
शहरात व परिसरात काही ठिकाणी डीपी उघड्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी बसवलेले सिक्युरिटी बॉक्स पडण्याच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका कायम आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, सर्व डीपी सुरक्षित केल्या गेल्या तर अनेक बिघाड व मेंटेनन्सची गरज कमी होईल.
रस्त्यामधील पोल आणि उघड्या वायरिंगचा खेळखंडोबा
अनेक रस्त्यांच्या मधोमध पोल उभारण्यात आले आहेत. काही भागांत तर घराच्या समोरून उघड्या तारा लोंबकळत आहेत. प्लॅस्टिक इन्स्युलेशनशिवाय या केबल्स धोकादायक ठरत आहेत. तारा एकमेकांना चिकटल्या तर घरासमोरच शॉर्टसर्किट होऊन जीवघेणा प्रसंग उद्भवतो.

क्षमतेपेक्षा जास्त लोड
शहरातील अनेक डीपींवर क्षमतेपेक्षा जास्त लोड टाकला जात आहे. नवीन डीपी बसवण्याऐवजी जुने डीपीच ओव्हरलोड केले जात आहेत. परिणामी दिवसभरात अनेक वेळा वीज खंडित होते. नागरिकांना त्यामुळे प्रचंड गैरसोय सहन करावी लागते.

वीजेतील चढउतार, नुकसान नागरिकांचे
अनेक भागांमध्ये वीजेतील चढउतारामुळे घरगुती व व्यावसायिक इलेक्ट्रॉनिक उपकरणं जळून जातात. फ्रिज, टीव्ही, कूलर यासारखी महागडी उपकरणं खराब होत असून नागरिकांचे हजारोंचे नुकसान होत आहे. व्यावसायिकांनाही वीजेच्या कमी-अधिक दाबाचा फटका बसतो.

फेजमधील अनियमितता
ठधइ या फेजवर लोड समान नसल्याने सतत शॉर्टसर्किट व वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे आगी लागल्याच्या घटना घडत असून नागरिक भयभीत आहेत.

नवीन कनेक्शनसाठी भ्रष्टाचार
नवीन कमर्शियल कनेक्शन मिळवताना अधिकार्‍यांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी विद्युत ग्राहक करतात. पूर्तता केली नाही तर अर्ज अनेक दिवस अर्ज प्रलंबित ठेवले जातात. लोकप्रतिनिधींची ओळख असेल तरच कामं लवकर होतात, अन्यथा नागरिकांना अडवले जाते. सोलर कनेक्शन व मीटरसाठीसुद्धा थर्ड पार्टीकडून कामं करून घेण्याची सक्ती केली जाते.

युवावार्ताची भूमिका
महावितरणचा कारभार हा नागरिकांच्या सेवेसाठी आहे, त्रास देण्यासाठी नाही. मात्र, सध्या परिस्थिती उलट आहे. हिरवाई संपवून झाडांची कत्तल, उघडी डीपी, धोकादायक वायरिंग, वीजेतील चढउतार, ओव्हरलोडेड डीपी, शनिवारी पूर्ण दिवस वीज खंडित करणे, नवीन कनेक्शनसाठी भ्रष्टाचार – हे सर्व प्रश्‍न एकाच वेळी उभे ठाकले आहेत. नागरिकांची सहनशीलता संपल्यानंतर अनेक प्रसंगी रात्री मोर्चे काढून नागरिकांनी संबंधित अधिकार्‍यांना जाब विचारले आहेत.
युवावार्ता ठामपणे सांगते की, हे अराजक सहन केले जात नाही. महावितरणने तातडीने जबाबदारी स्वीकारून योग्य साधने, नियोजन आणि पारदर्शकता आणावी. अन्यथा नागरिकांनी दिलेला इशारा लक्षात घेऊन मोठे जनआंदोलन उभे राहील आणि त्यासाठी जबाबदार फक्त महावितरण असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here