अंगणवाड्यांना स्वच्छतेची भेट

संगमनेर (युवावार्ता प्रतिनिधी) – लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत गरजू शाळांना शौचालय उपलब्ध करून देण्याचा एक आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नव्या वर्षाची सुरुवात ‘सेवाभावातून’ करत, क्लबने रहाणेमळा परिसरातील अंगणवाडीत शौचालय उभारून त्याचे लोकार्पण पदग्रहण सोहळ्याच्या औचित्याने पार पाडले.
या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पुणे येथील माजी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर एम.जे.एफ. ला. बी. एल. जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच माजी मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन ला. गिरीश मालपाणी, दीक्षा प्रदान अधिकारी ला. देविदास गोरे, व्हाईस डिस्ट्रीक्ट गव्हर्नर (१) श्रेयस दिक्षीत, माजी अध्यक्ष श्रीनिवास भंडारी, झोन चेअरपर्सन संजय उबाळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी स्वच्छता अत्यावश्यक आहे. स्वच्छ शौचालय, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि हात धुण्याची सुविधा असल्यास आजार टाळता येतात. विशेषतः मुलींसाठी ही सुविधा आत्मविश्वासासाठी महत्त्वाची आहे. स्वच्छता सवयींमुळे उपस्थिती वाढते, अभ्यासात लक्ष राहते आणि आरोग्य सुधारते. शाळांमध्ये बेसिक हायजिन सुविधा उपलब्ध करून देणे ही आजच्या काळाची गरज आहे. बेसिक हायजिनचा विचार करत संगमनेर सॅफ्रॉनने हा उपक्रम हाती घेतला आहे.
कार्यक्रमात पीडीजी जोशी यांच्या हस्ते शौचालयाची चावी शाळा समितीकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी गिरीश मालपाणी यांनी “सामाजिक कार्यात लायन्स सॅफ्रॉन नेहमीच अग्रेसर आहे,” असे सांगून पुढील टप्प्यात अधिक शाळांना मदत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या प्रकल्पासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेतला आहे. संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी यांनी ५ शौचालयांचे, व्ही.डी.जी. श्रेयस दिक्षीत यांनी २, माजी अध्यक्ष उमेश कासट यांनी २, तर नवीन अध्यक्ष कल्याण कासट यांनी ३ शौचालयांचे प्रायोजकत्व घेतले. एकूण १२ शौचालये या उपक्रमात वितरित करण्यात येणार असून, भविष्यात आणखी गरजू शाळांना या माध्यमातून मदत होणार आहे.
यावेळी क्लबचे अध्यक्ष कल्याण कासट, सचिव सुमित मणियार, कोषाध्यक्ष नामदेव मुळे, माजी अध्यक्ष देविदास गोरे, उमेश कासट, अतुल अभंग, धनंजय धुमाळ आणि इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे संगमनेर परिसरातील शिक्षण संस्थांना भक्कम पायाभूत सुविधा मिळण्यास निश्चितच मदत होणार आहे.