आरोग्यसेवेची गळती ! साकूर ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीची दयनीय स्थिती

0
1391

युवावार्ता (प्रतिनिधी) – साकुर – सरकार कोट्यवधी रुपयांचा खर्च करून आरोग्य सेवा ग्रामीण भागात पोहोचवण्याचा प्रयत्न करत असताना, संगमनेर तालुक्यातील साकूर येथील ग्रामीण रुग्णालयाची अवस्था मात्र धक्कादायक आणि संतापजनक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णालयाच्या मुख्य इमारतीत अक्षरशः गळती होत असून, रुग्णांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाला आहे.
शेकडो रुग्ण रोज या रुग्णालयात उपचारासाठी येतात. बाह्यरुग्ण असोत की आंतररुग्ण, त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच इमारतीच्या छतावरून पाणी झिरपते, कक्षांमध्ये बुरशीने घर केले आहे, आणि काही ठिकाणी छताचे पापुद्रे खाली कोसळत आहेत. ही केवळ गळती नव्हे – ही प्रशासकीय अनास्थेची गळती आहे.

शस्त्रक्रिया विभागाजवळील पॅसेजमध्ये गळतीमुळे काही महिने शस्त्रक्रिया बंद ठेवाव्या लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकंच नव्हे तर छतावरील 5 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी फुटलेली असून, स्लॅबवरील ड्रेनेज पाइप पूर्णतः निकामी झाले आहेत. ही स्थिती रुग्णालयाच्या सर्वच कर्मचार्‍यांसाठी आणि रुग्णांसाठी मृत्यूचा सापळा बनत चालली आहे.
विशेष म्हणजे रुग्णालय प्रशासनाने वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करून याकडे लक्ष वेधले होते. मात्र, बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी या गंभीर समस्येकडे पाठ फिरवली आहे. त्यांच्या निष्क्रियतेमुळे एक सुसज्ज सरकारी रुग्णालय आता धोक्याच्या उंबरठ्यावर उभे आहे.

छत कोसळून एखादी दुर्घटना घडल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोळे उघडणार का? रुग्णांचे प्राण गेले की मगच हलचाल होणार का? असा प्रश्‍न नागरिक विचारत आहे.
या प्रकाराकडे लोकप्रतिनिधींनी आणि आरोग्य खात्याने तातडीने लक्ष देणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, भविष्यात घडणार्‍या संभाव्य दुर्घटनेला सर्वस्वी जबाबदार ही यंत्रणा असेल, हे लक्षात घेतले पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here