तालुका पोलीसांची गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ; ग्रामस्थांचे आंदोलन
गुन्हेगारांना पायघड्या, निर्दोषांवर अन्याय
ग्रामस्थांचा पोलिसांवर आरोप
संगमनेर (युवावार्ता प्रतिनिधी) –
संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग गावातील रहिवासी महेंद्र सुर्वे यांच्या घरात घुसून तालुक्यातील गणोरे गावातील काही जणांनी लाठ्या काठ्यांनी जबरी मारहाण केली. या मारहाणीत महेंद्र सुर्वे गंभीर जखमी झाले असून त्यांचे वृद्ध वडील (वय – 83), पत्नी, मुलगी, मुलगा अशा घरातील सर्वांना जबरी मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत महेंद्र सुर्वे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांचा कान देखील तुटला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी गावातील ग्रामस्थांनी काल दिनांक एक जुलै 2024 रोजी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले असता तेथे गुंडांवर गुन्हा नोंदवण्याऐवजी आलेल्या ग्रामस्थांना हुसकावून लावल्याचा गंभीर आरोप जवळे कडलग ग्रामस्थांनी केला आहे. संगमनेर तालुका पोलीसांनी सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत आज मंगळवारी जवळे कडलग ग्रामस्थांनी संगमनेर गणोरे रास्ता रोको आंदोलन केले.
वरिष्ठांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन सदर गुन्हा दाबण्याचा प्रयत्न करणार्या पोलीस कॉन्स्टेबलला निलंबित करावे तसेच एक जुलैला रात्री घडलेल्या गुन्ह्याची नोंद करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत जर पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही तर उद्या नाशिक पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. गणोरे गावातील काही 10 ते 15 गुंडांनी निळवंडे पाटालगत राहणार्या महेंद्र रामनाथ सुर्वे यांच्या घरावर हल्ला केला. यावेळी ग्रामस्थांनी गुंडांना ओळखून तालुका पोलीस स्टेशनला गेले. मात्र पोलीसांनी या ग्रामस्थांना दाद न देता उलट हुसकावून लावले. आमच्या वरिष्ठ साहेबाने सांगितले की गुन्हा नोंद करून घेऊ नका तुम्हाला कुठे जायचे ते जा.
महेंद्र यांच्या डोक्यात जबरदस्त मार लागलेला असताना त्यांचा कान तुटलेला असताना त्याला कुठल्याही पद्धतीचे सरकारी दवाखान्यात उपलब्ध करून न देता हुसकावून लावणे यावरून तालुका पोलीस कुणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचे दिसून आले. आरोपींच्या हातामध्ये गज, चाकू असताना त्यांना चहापाणी करणार्या आणि ज्याच्यावर अन्याय झाला त्याला पिटाळून लावणार्या पोलिसांचा यावेळी ग्रामस्थानी निषेध केला. नागरीकांच्या प्रचंड दबावानंतर अखेर तालुका पोलीसांनी काही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हेगारांना मदत करीत ज्यांना मारहाण झाली, जे निर्दोष आहेत त्यांना त्रास देताना एकीकडे गुन्हेगारांना पायघड्या घातल्याने संपूर्ण तालुक्यामध्ये तालुका पोलिस स्टेशनविषयी चीड निर्माण झाली आहे.