पत्रकारीतेमुळे माणूस समृद्ध होतो – डॉ. खेडलेकर

0
970

युवावार्ता कार्यालयात युवामित्र संवाद उत्साहात

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – पत्रकारीता करणारा माणूस केवळ बातम्या देत नाही, तर तो समाजातील ज्वलंत प्रश्‍नांना वाचा फोडून शासन दरबारी पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य करत असतो. या प्रक्रियेत तो सतत वाचन, लेखन, चिंतन आणि निरीक्षण करत असल्यामुळे वैचारिकदृष्ट्या समृद्ध होत जातो. पत्रकारांनी आपल्या लेखनातून भाषा देखील समृद्ध करावी, त्यासाठी योग्य प्रशिक्षण घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संतोष खेडलेकर यांनी केले.
दैनिक युवावार्ता परिवाराच्या वतीने आयोजित युवामित्र संवाद युवावार्ता कार्यालयात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. खेडलेकर बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर दैनिक युवावार्ताचे संस्थापक व संपादक किसन भाऊ हासे, संपादिका सौ. सुशीला हासे, ज्येष्ठ पत्रकार बी. टी. शेळके, युवापॉलिप्रिंटचे संचालक इंजिनिअर आनंद हासे, डिजीटल माध्यम तज्ज्ञ संकेत ढेरंगे, कार्यकारी संपादक सुदीप हासे हे मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात डॉ. खेडलेकर यांनी दैनिक युवावार्ता आणि साप्ताहिक संगम संस्कृती या दोन्ही माध्यमांचा उल्लेख करून संगमनेर व परिसरातील गुणवत्तापूर्ण पत्रकार घडवण्यामध्ये किसन भाऊ हासे यांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील पत्रकारांना संघटित करून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन देणारे उपक्रम राबवले जातात. पत्रकारांनी समाजासाठी सतत जागृत राहून स्वतःचीही वैचारिक समृद्धी घडवावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


कार्यक्रमात बोलताना किसन भाऊ हासे यांनी सांगितले की, पत्रकारीता क्षेत्रात नव्याने येऊ पाहणार्‍या तरुणांसाठी युवावार्ता हे एक विश्‍वासार्ह व्यासपीठ म्हणून कार्यरत आहे. पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. त्यामुळे ग्रामीण भागात घडणार्‍या सकारात्मक घटना, समस्यांमधून होणारे बदल, तसेच अनिष्ठ प्रवृत्तींना नमोहरण करण्यासाठी पत्रकारांनी आपली लेखणी वापरावी. अनेक होतकरू तरुण, शेतकरी, उद्योजक, संस्था दिशादर्शक कार्य प्रभावीपणे करीत असून, त्यांचे कार्य समाजासमोर मांडण्यासाठी पत्रकारितेचे माध्यम अत्यंत प्रभावी आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रसार माध्यमांची विविध क्षेत्रे पत्रकारितेस उपलब्ध असून प्रसारनाचा वेग, अचूकता व तंत्रज्ञान यावरच वृत्तांकनाचा दर्जा अवलंबून असतो.
या वेळी बी. टी. शेळके यांनी आपल्या पत्रकारितेचा अनुभव, अडचणी आणि संधी याबाबत मार्गदर्शन केले. संकेत ढेरंगे यांनी डिजिटल पत्रकारितेच्या वाढत्या प्रभावाबाबत माहिती दिली. इंजिनिअर आनंद हासे यांनी कोणताही उद्योग किंवा व्यवसाय यशस्वीपणे करायचा असल्यास त्यासाठी योग्य प्रशिक्षण अनिवार्य असते असे सांगत युवकांना प्रेरित केले. कार्यक्रमात उपस्थित युवामित्रांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन कार्यकारी संपादक सुदीप हासे यांनी केले तर उपसंपादक संजय आहिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here