राज्यात महायुतीविराेधात माेठी लाट- आ. थाेरात

0
1827

संगमनेर मधील अमृता लॉन्स येथे पार पडली शिर्डी मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांची बैठक

युवावार्ता (प्रतिनिधी)-
देशात वाढलेली महागाई व बेरोजगारी, याचबरोबर महिलांचे, शेतकर्‍यांचे मोठे प्रश्न आहेत. मात्र यावर सरकार बोलत नसून धार्मिकतेचे मुद्दे पुढे केले जात आहेत. भाजपाच्या फसव्या जाहिरातबाजीला लोक कंटाळले असून राज्यात महायुतीच्या विरोधात मोठी लाट आहे तर महाविकास आघाडीचीच सर्वत्र हवा आहे. जन कल्याणाचा महाविकास आघाडीचा विचार सर्वांनी घराघरात पोहोचवावा असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहेत.


अमृता लॉन्स येथे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार लहू कानडे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मा. आमदार डॉ. सुधीर तांबे, शिवसेनेचे रावसाहेब खेवरे, कॉम्रेड डॉ. अजित नवले, हेमंत ओगले, डॉ. एकनाथ गोंदकर, श्रीकांत मापारी, करण ससाने, शिवाजी नेहे, श्रीमती सुनीता भांगरे, मधुकर तळपाडे, शिवसेनेचे जगदीश चौधरी, संजय फड, आप्पासाहेब केसकर, सुधीर म्हस्के, सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, बाबा ओहोळ, इंद्रजीत थोरात, रणजीत सिंह देशमुख आदींसह शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, देशात इंडिया आघाडीला आणि राज्यात महाविकास आघाडीला अत्यंत अनुकूल वातावरण आहे. सर्वत्र वाढलेली बेरोजगारी व महागाई हे महत्त्वाचे मुद्दे आहे .मात्र यावर सरकार बोलत नाही. धार्मिकतेचे मुद्दे पुढे केले जात आहे. फसव्या जाहिरातींमधून दिशाभूल होत आहे. आता जनता या लोकांना कंटाळली आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळणार असून अहमदनगर जिल्ह्यातील अत्यंत चांगले वातावरण आहे. आपसातील मतभेद दूर करून सर्वांनी एक महिन्याभर अत्यंत
चांगले नियोजन करा. सध्याच्या सरकार विरोधात कमीत कमी प्रत्येकाला 100 मुद्दे सापडतील. मात्र मीडिया शांत बसून आहे. सत्ताधार्‍यांच्या विरोधात मीडिया बोलायला तयार नाही. त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. माध्यमे एकतर्फी झाली की काय अशी शंका देशाला निर्माण होत आहे. असे ते म्हणाले. तर माजी मंत्री प्राजक तनपुरे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर येतात सर्वांना कर्जमाफी दिली. कोरोना काळात अत्यंत चांगले काम केले. आज शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे, आमदार बाळासाहेब थोरात आणि सर्व नेते एकत्र असून महाविकास आघाडीला मोठे यश मिळणार असल्याचे ते म्हणाले. तर भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, पक्षाने टाकलेला विश्वास आणि जनतेचा विश्वास आपण सार्थ ठरून जनतेचा खासदार म्हणून आपल्या सर्वांच्या सोबत अत्यंत प्रामाणिकपणे काम करू. तर माजी आ. डॉ. तांबे म्हणाले की, ही निवडणूक लोकशाहीच्या अस्तित्वाची आहे. पुढील पिढ्यांचे भवितव्य ठरवणारी आहे.
यावेळी सचिन गुजर, करण ससाने, सुहास वहाडणे, अमर कातारी, प्रा. बाबा खरात, अशोक सातपुते, मोहन करंजकर, मिलिंद कानवडे, मुळा कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर , आपचे आघव यांचीही भाषणे झाली. या बैठकीसाठी संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, राहता, कोपरगाव, नेवासा, राहुरी, येथील महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांचे विविध पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here