गुंजाळवाडीकडून वाहणारा व पुढे म्हाळुंगी नदिला मिळणार्या ओढ्याचे रुपांतर अतिक्रमणामुळे गटारीत
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – सतत सुरू असलेला पाऊस, त्यामुळे झालेला चिखल त्यातच उघड्या गटारी आणि नागरीकांनी बेकायदेशीर केलेल्या कचराकुंड्या त्यावर फिरणारे डुकरे व मोकाट जनावरे, त्यातून प्रचंड सुटणारी दुर्गंधी व डासांचा उपद्रव यामुळे गुंजाळवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असणार्या रहाणे मळा व परिसरातील बटवालमळा नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
संगमनेर शहरातलगत असल्याने गुंजाळवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झालेले आहे. दरम्यान गुंजाळवाडीकडून वाहणारा व पुढे म्हाळुंगी नदिला मिळणार्या ओढ्याचे रुपांतर अतिक्रमणामुळे गटारीत झाले आहे.
ही गटार उघडी असून त्यात मलामुत्र, मेलेले जनावरे, कचरा मोठ्या प्रमाणावर साचला जात असल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली जात आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने व ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात येत नसल्याने या परिसरातील नागरिकांंचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या पावसामुळे साथीच्या आजारात वाढ होत असताना या परिसरातील या समस्येमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक लवकर आजाराला बळी पडत आहेत.