कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीचा निर्घृण खून; घारगाव घटना

0
1037

युवावार्ता (प्रतिनिधी)
घारगाव- तालुक्यातील घारगाव येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने कुर्‍हाडीने गळ्यावर व डोक्यावर वार करून पत्नीची निर्घृन हत्या केली. ही धक्कादायक घटना गुरुवार दि.31 जुलै रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली. चंद्रकला दगडू खंदारे (रा. घारगाव, ता. संगमनेर) असे मयत पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून दगडू लक्ष्मण खंदारे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला गजाआड केले तर न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, मयत चंद्रकला दगडू खंदारे या घारगाव येथे कुटुंबासह वास्तव करीत होत्या. त्यांना एक मुलगा व सुन असून ते तेथेच घराशेजारीच राहतात. आरोपी पती दगडू खंदारे हा नेहमी पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नी बरोबर वाद करत होता. गावातील एका व्यक्ती बरोबर पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत काही दिवसांपूर्वी त्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्याने वाद घातला होता. दरम्यान, बुधवार दि.30 जुलै 2025 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास दगडू खंदारे व कुटुंबातील सर्वजण एकत्र आले असता जेवणानंतर दगडू खंदारे याने पत्नीला अनैतिक संबंधाच्या कारणावरून शिवीगाळ केली. तुझे आणि एका व्यक्तीचे अनैतीक संबंध आहे. तु त्याच्याकडे निघुन जा. त्यावेळी मुलाला तो म्हणाला की, तुझ्या आईचे आणि एका व्यक्तीचे अनैतिक संबंध आहे. एकदिवस मी तुझ्या आईला नाहीतर त्या व्यक्तीला तरी मारून टाकणार आहे.
त्यानंतर आरोपी दगडु खंदारे हा झोपण्यासाठी शेतातील पत्र्याच्या खोलीमध्ये गेला. वडील शांत झोपले की नाही हे पाहण्यासाठी मुलगा रात्री 1 वा. घराकडे गेला. मुलगा घरात शिरला तेव्हा आई चंद्रकला खंदारे ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. त्याने आईला उठवण्याचा प्रयत्न केला असता तिचा जागीच मृत्यू झाल्याचे लक्षात आले. यावेळी तिच्या मृतदेहाजवळ कुर्‍हाड देखील अढळून आली. त्यानंतर मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात दगडु लक्ष्मण खंदारे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडताच पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here