वांझोटीला पोर होईल पण निळवंडे होणार नाही म्हणणारे विरोधक खालच्या पातळीचे – थोरात

घुलेवाडीच्या पहिल्या सभेतून थोरातांसह डॉ. जयश्रींचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल



खालच्या पातळीवर भाषा वापरणार्‍यांना मी आज ताकीद देते. मी जशी बाळासाहेब थोरातांची मुलगी आहे, तसा संयम मी राखू शकते. पण एक लक्षात ठेवा मी स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरातांची सुध्दा नात आहे. माझ्याविषयी अपशब्द काढले तर मी खणकावू शकते असा जोरदार प्रहार जयश्री थोरात यांनी सुजय विखे यांच्यावर केला. तालुक्यात तुमचे स्वागत आहे पण तालुक्याचे वाटोळे आम्ही होऊ देणार नाही. जो कोणी समोर उभा राहिल त्याचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.


युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – गोरगरीब माणसांना चांगले जीवन देण्यासाठी येथील राजकारण आहे. सुसंस्कृत व प्रगतशील ही संगमनेर तालुक्याची मोठी ओळख आहे. मात्र ज्यांच्या तालुक्यात खरी दहशत आहे ती लोक इकडे येऊन खोटे आरोप करतात. त्यांच्या तालुक्यात जाऊन त्यांच्या समर्थकांना विचारा ते सांगतील राज्यात संगमनेर सगळ्यात चांगला तर खरी दडपशाही राहता तालुक्यामध्ये आहे. दडपशाहीच्या जोरावर त्यांचे राजकारण इकडे आणण्याचा त्यांचा प्रयत्न असून या दडपशाहीच्या व्हायरसला येऊ द्यायचे नाही असे आवाहन विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. घुलेवाडी येथे युवा संवाद यात्रेच्या सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. जयश्रीताई थोरात, सिताराम राऊत, मिलिंद कानवडे, सरपंच निर्मलाताई राऊत, निर्मलाताई गुंजाळ, सुनीताताई अभंग, राजू खरात, अमृता राऊत, उपसरपंच दत्तू राऊत, अनिल राऊत, ऋतिक राऊत, नवनाथ अरगडे, भास्कर पानसरे आदींसह घुलेवाडीतील ग्रामस्थ युवक व महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम संगमनेर तालुक्यात केले आहे. याउलट राहता तालुक्यात त्यांची मोठी दहशत आहे. कोणी विरोधी बोलले तर तंगड्या मोडल्या जात आहे. त्यांच्या कट्टर समर्थकांना विचारले तर ते सुद्धा सांगतील की संगमनेर तालुका हा सर्वात चांगला तर सर्वात दडपशाही राहता तालुक्यामध्ये आहे.

वांझोटीला पोर होईल पण निळवंडे होणार नाही असे म्हणणारे विखे किती खालच्या पातळीला बोलतात हे तुम्ही पाहिले. धरण बांधण्यात आमचा वाटा आणि पाणी सोडायला गेलेले विखे स्वत:ला जलदूत म्हणतात ही लाजीरवाणी गोष्ट आहे. प्रभावतीताई घोगरे म्हणाल्या खासदार विखे पडले पण ते डोक्यावर पडले हे आज समजले अस काहीसं असू शकतं. स्वत:चे कारखाने, सहकार ज्यांनी खड्ड्यात घातला. कर्जबाजारी केला अशा लोकांनी आम्हाला शिकवू नये. संगमनेरची बाजारपेठ नगरमध्ये 1 नंबरला असून विखेंना हे सहन होत नाही.

मी आठ वेळेस आमदार राहिलो. सातत्याने जनतेचे काम केले विरोधकांचाही सन्मान केला. कधीही कुणाला अडकाठी निर्माण केली नाही. यांनी आपल्यावर बोलावे?
हे एकदा दक्षिणेत खासदार झाले तरी लोकांनी यांना त्यांची जागा दाखवली. इकडे येऊन विकासाच्या गप्पा करतात. 2014 मध्ये आपला बायपास पूर्ण झाला. नगर – मनमाड हा गजक्यांचा रस्ता अजूनही खड्ड्यांचा रस्ता म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. खासदार, आमदार, मंत्रीपदे अशी साठ वर्षे सत्ता असून काही करता आले नाही. आता एमआयडीसी सांगतात ही एमआयडीसी फक्त निवडणुकीपुरती आहे. यांच्या भाषणाची पद्धत वैचारिक पद्धत हे अत्यंत दुर्दैवी आहे. पैशाच्या जोरावर ते इकडे येऊन नागरिकांना खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र हा संगमनेर तालुका स्वाभिमानी आहे कधीही विकला जाणार नाही. निळवंडे धरण कालवे आपण पूर्ण केले. या कामांमध्ये आडकाठी निर्माण करण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. हे सर्वश्रुत आहे. आणि तोडून मोडून आलेल्या सरकारच्या जोरावर पाणी सोडले. आणि सांगतात की काम कोणी केले हे महत्त्वाचे नाही तर पाणी आम्ही सोडले असे ते सांगतात. अरे ही काय पद्धत आहे का.

मागील अडीच वर्षात संगमनेर तालुक्यातील जनतेला खूप त्रास दिला. परंतु स्वाभिमानी जनता त्यांच्यापुढे झुकली नाही. सर्वांना आपल्या तालुक्याची चांगली संस्कृती, राजकारण, समाजकारण जपायचे आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातून सर्वात मोठा विजय मिळवण्यासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी करताना राहता तालुका हा दहशतमुक्त करायचा आहे असेही सांगितले. तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, संगमनेर तालुका हा विस्ताराने खूप मोठा असून आमदार बाळासाहेब थोरात यांनी अगदी कुटुंबाप्रमाणे सांभाळला आहे. गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. बाहेरून लोक येऊन येथे दडपशाहीचे भाषण करत आहेत त्यांचे भाषणे हावभाव ही संस्कृती आपली नाही. ते घाबरली असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पण मी जशी शांत संयमी आमदार बाळासाहेब थोरात यांची कन्या आहे. तशी स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांची नात सुद्धा आहे हे ही त्यांनी लक्षात ठेवावे असा इशारा दिला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख