
संबंधितावर कारवाई करण्याची महिलेची मागणी
संगमनेर (प्रतिनिधी)
मुलाला नोकरी लावून देतो – असे आमिष दाखवून एका भामट्याने 6 लाख 36 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. यातील संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी संगमनेरातील एका महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.
याबाबत सुनीता सुनील वैद्य (रा. घासबाजार, संगमनेर) यांनी ही तक्रार केली आहे. या तक्रार अर्जात त्यांनी म्हटले आहे की, संगमनेर येथील एक महिला व जालना येथील एकजण याने आपणास पोलीस मदतनीस असल्याची ओळख दाखवली. त्यांच्याशी मैत्रिणीमार्फत ओळख झाली होती. त्यातून मुला-मुलींना सरकारी नोकरी लावून देतो असे सांगितले. आपली मुलगी व माझा भाचा यांना नोकरीला लावा असे त्यांना सांगितले. त्याबदल्यात एकजणाला 5 लाख रुपये द्यावे लागतील असे त्याने सांगितले. त्यानुसार त्यांना 2 लाख रुपये रोख स्वरुपात दिले. त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा 2 लाख रुपयांचा धनादेश दिला. तुमचे काम झाले नाही तर तुम्ही हा धनादेश टाकू शकता, असे ते म्हणाले. त्यानंतर उरलेली रक्कम तुमच्याकडे जशी येईल तशी टाका. त्यानुसार 1 एप्रिल 2023 रोजी त्यांच्या खात्यावर एक लाख रुपये टाकले. 5 एप्रिल रोजी पुन्हा एक लाख दहा हजार रुपये टाकले. तसेच महिलेच्या खात्यावर माझ्या बहिणीच्या मुलाने 1 लाख 32 हजार रुपये असे एकूण 6 लाख 36 हजार रुपये दोघांना मिळून टाकले आहेत. मात्र, त्यानंतर मुलास नोकरी लागली नाही. त्यावर आम्ही आमच्या पैशांची मागणी केली. परंतु ते काही ना काही कारणे देऊन टाळाटाळ करू लागले. सदर इसमांनी आमची फसवणूक केली असून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी फसवणूक झालेल्या महिलेने केली आहे. आता पोलीस यावर काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.





















