राहता तालुक्यातील विविध गावांमध्ये नागरिकांशी संवाद
शिर्डी/ राहता (प्रतिनिधी)–अनेक वर्ष एकाच घरात सत्ता असूनही राहता तालुक्याचा विकास रखडला आहे. माझे गाव या मतदारसंघात असून येथे दहशतीचे वातावरण सत्ताधाऱ्यांनी निर्माण केले आहे. यातून मुक्तता करण्यासाठी व राहता तालुक्यातील नागरिकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ प्रभावतीताई घोगरे यांना मोठे मताधिक्य देऊन विजयी करावे असे आवाहन मा. आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केले आहे. राहता तालुक्यातील चिंचपूर, दाढ, चणेगाव, आश्वी, हसनापूर, राहाता, येथील विविध समाजाची प्रतिनिधी व नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी समवेत रिपाई नेते बाळासाहेब गायकवाड, विजय हिंगे, सौ दिपाली वर्पे ,सौ शितल उगलमुगले ,राजेंद्र चकोर, गणपतराव सांगळे, आदिसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ तांबे. म्हणाले की, एकेकाळचा पेरू बागांनी विकसित असलेला राहता तालुका सत्ताधाऱ्यांनी भकास केला आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांनी गणेश कारखाना अत्यंत उत्कृष्टपणे चालवला चांगला भाव दिला. आणि कर्मचाऱ्यांना पगारही वेळेत दिले. या कारखान्याला अडचणी निर्माण करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी काम केले. मात्र चांगले काम असेल तर परमेश्वराच्या आशीर्वाद असतात. संगमनेर तालुक्यातील स्वातंत्र्याची व सुसंस्कृतपणाचे वातावरण राहता तालुक्यात निर्माण करण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत नम्र स्वभावाच्या उमेदवार सौ प्रभावती घोगरे या किल्ला लढवत आहेत.
जनतेचे मोठे पाठबळ ही त्यांची जमेची बाजू असून जनता दहशतीतून बाहेर येऊन त्यांना साथ देत आहे. नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता हे दडपशाहीचे झाकण उघडून देण्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सौ प्रभावती घोगरे यांना राज्यातून सर्वाधिक मतांनी विजयी करत जाईंट किलर ठरवावे असे आवाहन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. तर गणपतराव सांगळे म्हणाले की, ही निवडणूक राहता तालुक्याच्या अस्मितेची आणि परावर्तनाची आहे. प्रभावती ताई घोगरे या सामान्य शेतकऱ्याची प्रतिनिधित्व करत आहेत. राज्याचे नेते म्हणणारे राहता तालुक्याच्या पुढार्यांना त्यांनी तालुक्यातच अडकून ठेवले आहे ही त्यांची ताकद आहे. यावेळी प्रत्येक गावातील नागरिकांनी प्रभावती ताई घोगरे यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी घोषणा देत परिसर दुमदुमून दिला.