मतदाराने दाखवला द्वेष आणि केला विकृतीचा कळस
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर -महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी राज्यभरात मतदान झाले. निवडणुक आयोगाची बंदी असताना देखील अनेक जणांनी मतदान केंद्रात बेकायदेशीरपणे मोबाईल घेऊन जात मतदान करतानाचे फोटो व शुटींग काढून ते सोशल मीडियावर टाकले. मात्र ते टाकत असताना काहींचा विकृती आणि द्वेषाचा किळसवाणा प्रकार दिसून आला. तालुक्यातील घुलेवाडी येथील एका मतदान केंद्रावर हा प्रकार समोर आला असून पुणे जिल्ह्यातील पिंपरी निखळ येथील एका तरुणाला पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे.
बुधवारी राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी अपवाद वगळता सर्वत्र उत्साहात मतदान झाले. निवडणुक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये मतदान केंद्रापासून दोनशे मिटर अंतरापर्यंत मोबाईल वापरण्यास पुर्ण बंदी असताना मतदान केंद्रावरील कर्मचार्यांच्या हल्गर्जीपणामुळे अनेक जण मोबाईल घेऊन आत गेले. काही जणांनी मतदान करतानाच फोटो व शुटिंग केले. ते करून सोशलमिडीयावर अपलोड करीत मतदानावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च विद्यालय केंद्रावरील खोली क्रं.3 मध्ये एका मतदाराने मतदान करतानांचा व्हिडिओ शुट केला. सोबतच आपला ज्या पक्षावर किंवा उमेदवारावर राग आहे त्याच्या चिन्हासमोर विचित्र हावभाव केले. अतिशय द्वेष आणि विकृतीचे दर्शन यावेळी या तरुण मतदाराने दिले.
धनुष्यबान चिन्हा समोरील बटन दाबून त्याने आपला राग शांत केला. या वरून या निवडणुकीत किती द्वेषपूर्ण वातावरण होते हे दिसून आले. प्रचारात देखील धार्मिक व व्यक्ती द्वेष मोठ्या प्रमाणावर दिसून आला. दरम्यान निवडणुक आयोगाकडून कठोर निर्बंध असताना देखील तेथील मतदान अधिकारी व कर्मचार्यांच्या हल्गर्जीपणामुळे असे अनेक गैरप्रकार अनेक मतदान केंद्रावर आढळून आले असून अशा बेजबाबदार अधिकार्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. दरम्यान पिंपळे निलख येथील विद्या विनयनिकेतन शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 474 या मतदान बुथवर बुधवारी सकाळी सव्वा अकरा वाजता मार्टिन जयराज स्वामी (वय 25, रा. संध्यानगरी सोसायटी, पिंपळे निलख) याने मतदान करताना मोबाईलचा वापर केला.त्याच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात निवडणूक मतदान केंद्र अधिकारी नरेंद्र देशमुख (रा. भांगरवाडी, लोणावळा) यांनी फिर्याद दिली आहे. या इसमाने स्वतःचे मतदान करताना, बॅलेट युनिट व व्हीव्हीपॅट यांचे फोटो काढल्याचे व बॅलेट युनिटवरील अं. क्रमांक 1 वरील तुतारी वाजविणारा माणूस या निशाणीवर बटण दाबून मत टाकल्याचा व तशी स्लिप व्हीव्ही पॅटमध्ये दिसून येत असल्याचा फोटो, व्हिडिओ काढला होता. हा फोटो व व्हिडिओ त्याने स्वतःचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी ठेवून प्रसारित केला. हे करताना त्याने मतदान प्रक्रियेच्या गोपनियतेचा भंग केला व निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केले, म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. मतदानाप्रसंगी स्थानिक निवडणूक अधिकारी व प्रशासनाने जोरदार तयारी व नियोजन केले होते. मात्र काही ठिकाणी मतदान केंद्राबाहेरच मोबाईलचा वापर, वाहनांचा वापर, देवाण-घेवाण सुरू असल्याचे देखील पहायला मिळाले.