चार डोक्यांना घेऊन होतेय स्पॉट फिक्सिंग
विखे आणि थोरातांच्या मिम्सचा सोशल मिडियावर पाऊस
लोकसभा निवडणूकीत नरेटिव्ह शब्द चांगलाच परवलीचा बनला होता. विरोधी काँग्रेस पक्षाकडून राज्यघटना व लोकशाही धोक्यात असे नरेटिव्ह पसरविण्यात आले होते व ते काही प्रमाणात यशस्वी झाले. हे लक्षात घेता भाजप व शिवसेनेकडूनही याच अस्त्राचा वापर करीत सोशल मिडीयावर मोठ्याप्रमाणावर फेक नरेटिव्हचा मारा सुरू आहे. यासाठी युट्यूब सारख्या छोट्या माध्यमांचा वापर खुबीने केला जात आहे. कोणतीही पार्श्वभूमी किंवा मागची -पुढची माहिती नसतांना वेगवेगळ्या मिम्स, द्वेषपुर्ण व तेढ निर्माण करणारी माहिती पसरून मते मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – युट्युब हे जनसामान्यांपर्यंत पोहचणारे अतिशय सोपे आणि वेगवान साधन आहे. मात्र सोशल मीडियाद्वारे पसरविणार्या या कंटेंट च्या वरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून काही नवीन युट्युब चॅनल्स आणि सोशल मीडियावरील मुलाखतीचा आढावा घेतला तर त्या मुलाखतीच कुणाला तरी फायदा करून देण्यासाठी केलेल्या दिसतात. ज्यांचा राजकारणाशी दूरान्वये संबंध नाही अशा चार पाच टाळक्यांना एकत्र करून मुलाखती आणि बाईट्स घेण्याचा प्रकार जोरात चालल्याचे दिसते. ही चॅनेल्स अचानक कुठून उगवली याबाबतही समाजमाध्यमांमध्ये जोरदार चर्चा आहे. ही चॅनेल्स स्वतःहून आली की आणली गेली अशी प्रश्ने देखील उपस्थित होत आहेत.
यंदाची विधानसभा निवडणूक उमेदवारांसाठी आणि सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. दरम्यान संगमनेरचे आठ वेळा प्रतिनिधित्व केलेले आ. बाळासाहेब थोरात यंदा मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचे कार्यकर्ते आणि सोशल मीडिया पोस्ट सांगत आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटप बाबत काँग्रेस हायकमांडने बाळासाहेब थोरात यांच्यावर जबाबदारी सोपविल्याने थोरातांचे पक्षातील व महाराष्ट्रातील वजन सर्वांना समजले आहे. अशा परिस्थितीत टायगर अभी जिंदा हे चा नारा देत सुजय विखे मात्र आपल्या लोकसभा पराभवाचा बदला घेण्यासाठी आसुसलेले दिसत आहेत. तळेगाव, साकूर आणि हिवरगाव पावसा येथे झालेल्या सुजय विखे यांच्या सभेला उपस्थितांची गर्दी बघायला मिळाली. आ. थोरात यांच्या ठेकेदार कार्यकर्त्यांवर आणि येथील विकासावर विखे यांनी जोरदार प्रहार करत निवडणूकीत रंगत आणत सभांचा तडाखा लावला आहे. माजी खा. सुजय विखे यांना त्यांच्याच शब्दात उत्तर देताना डॉ. जयश्री थोरात यांनी माझ्या बापाला काही बोलाल तर याद राखा असा सज्जड दम दिला आहे. कै. भाऊसाहेब थोरात यांच्यानंतर थोरात घराण्यातील आक्रमकपणा डॉ. जयश्री थोरात यांच्यामध्ये दिसून येत आहे. संगमनेरमध्ये पहिल्यांदाच जयश्री थोरात यांच्या रूपाने महिला कार्यकर्ता संगमनेर तालुका युवा संवाद रॅली च्या रूपाने ढवळून काढत आहे. थोरात आणि विखे घराण्याची तिसरी पिढी आमनेसामने उभी ठाकली असली तरी कार्यकर्ते सोशल मीडिया पोस्टमधून आक्रमक झाले आहेत.
याआधी विखे समर्थक थोरात यांचे मिम्स बनवताना दिसत होते आता त्यात थोरात समर्थकही विखे यांचे मिम्स बनवताना दिसत आहेत. संगमनेरचे कार्यकर्ते कधी मिम्स बनवताना दिसले नाही मात्र आता आ. थोरात यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना फ्री हँड दिल्याचे समजत आहे खा. निलेश लंके यांच्या प्रचारासाठी आपली कुमक पाठविणारे थोरात प्रभावती घोगरे यांच्या पाठीशी भक्कम उभे असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळेच की काय सुजय विखे आपली पूर्ण ताकद पणाला लावत संगमनेरमध्ये कमळ फुलविण्याचे प्रयत्न करीत आहेत.
संगमनेरमध्ये पूर्वी शिवसेनेचे स्वतःचे अस्तित्व चांगले होते. आता मात्र तसे दिसून येत नाही. स्थानिक भाजपा पदाधिकार्यांमध्ये भाजपचे इतके गट तट आहेत की त्यांनाच समजत नाही आपण नेमके कोणत्या गटात आहोत. जुने भाजप पदाधिकारी आणि विखे समर्थक भाजप पदाधिकारी यांच्यात नाही म्हटले तरी तू तू मै मै बघायला मिळते.
राजकारणात बोलण्याचा स्तर खालावला असला तरी सोशल मीडियावर तो स्तर पूर्णपणे ढासळला आहे. फेक नरेटिव्हमुळे जनता दोन सेकंदात व्हिडीओ आणि पोस्ट बदलत आहे.
वृत्तपत्र या काळातही आपला विश्वास जपत आहेत ही एक सकारात्मक बाब आहे. निवडणुकीच्या या धामधुमीत शासनाचा अंकुश नसलेला सोशल मीडिया आणि युट्युब अजून सामान्यांना काय काय दाखवणार हे हा प्रश्न सामान्यांना पडला आहे.