मुख्यमंत्री फडणवीसांकडून पहिल्यांदाच भाजप व्यतिरिक्त आमदाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

फडणवीसांनी शुभेच्छा दिल्याने आमदार सत्यजीत तांबे यांचे महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील स्थान अधोरेखीत
संगमनेर (प्रतिनिधी)-अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. विशेष म्हणजे, भाजप व्यतिरिक्त इतर कोणत्याही आमदाराला शुभेच्छा देण्याची ही फडणवीसांची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या शुभेच्छा केवळ वैयक्तिक आहेत की त्यामागे राजकीय संदेश दडले आहेत, यावर चर्चा सुरू झाली आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीपासूनच या मैत्रीची सुरुवात झाली. काँग्रेस सोडून अपक्ष म्हणून लढलेल्या सत्यजीत तांबे यांना भाजपने खुलेपणाने पाठिंबा दिला होता. त्यानंतर विधिमंडळातील भेटीगाठी, चर्चासत्रे आणि कार्यक्रमांमध्ये फडणवीस आणि तांबे एकत्र दिसू लागले. या नात्याला अधिक रंग मिळाला तो CitizenVille पुस्तक प्रकाशनावेळी. त्या वेळी फडणवीसांनी थेट विधान केलं होतं, “तुम्ही सत्यजीतला किती दिवस बाहेर ठेवणार? नाहीतर आमचाही डोळा आहे सत्यजीतवर!” या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती.

अलीकडेच सत्यजीत तांबे यांची राज्याच्या सुधारीत युवा धोरण समिती आणि महत्त्वाच्या लोकलेखा समितीवर (PAC) नियुक्ती झाली आहे. ही निवड अधिकृतरीत्या नियमानुसार असली, तरी राजकीय वर्तुळात यामागे फडणवीस–तांबे समीकरणाचा प्रभाव मानला जातो.
संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे महायुती आमदार अमोल खताळ आणि फडणवीस यांचे संबंध फारसे चांगले नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले आणि सध्या अपक्ष असलेले तांबे आणि फडणवीस यांची जवळीक अधिकच ठळकपणे जाणवते.काहींच्या मते ही फक्त व्यक्तिगत मैत्री आहे; तर काहींना यात भविष्यातील राजकीय खेळी दडलेली दिसते. राजकारणात समीकरणे क्षणात बदलतात, पण फडणवीस–तांबे यांची मैत्री मात्र एका वेगळ्याच पातळीवर असल्याचे सर्वमान्य आहे. त्यामुळे या समीकरणाचे परिणाम भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणावर नक्कीच जाणवतील, यात शंका नाही.

फडणवीस-तांबे हे दोन्ही नेते नेहमीच एकमेकांचा आदर करताना दिसतात. काही दिवसापूर्वी आमदार तांबे एका जाहीर सभेत म्हणाले होते मी विरोधी आमदार नाही, त्यांच्या या वक्तव्यावरुनही त्यांचा कल दिसून येत होता. विकास कामांसाठी या दोन्ही नेत्यांत नेहमी होणारी गाठ भेट ही नेहमीच कुतुहलाचा विषय राहिला आहे.
आमदार तांबे हे एक अभ्यासू नेते म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे. युवकांमध्येदेखील त्यांची मोठीे क्रेझ आहे. एक व्हिजन असणारा युवानेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. यातुनच देवेंद्र फडणवीस यांची नजर आमदार तांबे यांच्यावर असते.
आपल्या अभ्यासू शैलीने आमदार तांबे यांनी संगमनेरच्या व नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या विकासासाठी मोठा निधी मिळवळाच शिवाय अनेक प्रलंबित कामे देखील मार्गी लावली. त्यांचा पाठपुरावा विषयांचा अभ्यास यामुळे देखील सत्तेत नसतानाही अपक्ष आमदार म्हणून त्यांनी सत्ताधारी पक्षांच्या अनेक मोठ्या नेत्यांशी आपले मधुर संबंध प्रस्थापित केले आहे. त्यातुनच त्यांची एक वेगळी इमेज तयार झाली आहे. असा अभ्यासू युवानेता कोणत्याही पक्षाला नको असतो?
त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार तांबे यांच्या पाठीशी उभे राहताना दिसतात. आज त्यांच्या या वाढदिवसानिमित्तदेखील पक्ष बाजुला ठेवून देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सत्यजीत तांबे यांना शुभेच्छा दिल्याने आमदार सत्यजीत तांबे यांचे महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील स्थान अधोरेखीत होत आहे.
