धोक्यात आलेली राज्यघटना जपण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहा- मा.आ.डॉ. तांबे

0
1315

छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा होणार

लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर बस स्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा व  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ त्यांचा भव्यदिव्य पूर्णाकृती पुतळा उभा करण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून हे दोन्ही पुतळे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करू असे सौ. दुर्गाताई तांबे यांनी सांगितले. यावेळी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.

संगमनेर (प्रतिनिधी)–भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर व तालुक्यात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून अत्यंत उत्साहाने जयंती साजरी झाली. यावेळी समानतेचा हक्क देणारी भारतीय राज्यघटना ही धोक्यात आली असून ती जपण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहावे असे आवाहन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे मा. आमदार व पुरोगामी विचारवंत डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान व राष्ट्रीय दलित पॅंथर यांच्या वतीने 133 व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सौ दुर्गाताई तांबे ,कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, युवा नेत्या उत्कर्षाताई रुपवते, प्रा. हिरालाल पगडाल,बी आर कदम, प्रा. शशिकांत माघाडे, श्रीमती कुसुमताई माघाडे,माणिकराव यादव, ए.पी बनसोडे , गौतम गायकवाड, के एस गायकवाड ॲड .अमित सोनवणे, प्रा बाबा खरात, दलित पॅंथरचे राजू खरात, प्रवीण गायकवाड, नवनाथ आरगडे ,सिताराम राऊत, प्रकाश वाघमारे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी समाजप्रेरणा पुरस्काराने आदित्य घाडगे, अशोक जगताप, आणि जी.बी. कदम यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तर राष्ट्रीय दलितांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना मा.आमदार डॉ तांबे म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जगातील अत्यंत विद्वान  व्यक्तिमत्व होते अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास अशा विविध विषयात त्यांचा गाढा अभ्यास होता. बहुजनांना गुलामीच्या जोखडातून बाहेर काढताना त्यांनी भारताला समानता देणारी राज्यघटना दिली.

ही राज्यघटना सध्या मूठभर लोकांच्या हातामध्ये आहे. त्यांना समतेचे तत्व नको आहे. त्यामुळे राज्यघटना धोक्यात आली आहे. मानवतेचा धर्मग्रंथ असलेली या राज्यघटनेच्या तत्त्वांची रोज पायमल्ली होत आहे. हे तत्व जपण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. महापुरुषांनीही समाज परिवर्तनासाठी संघर्ष केला आहे. आपल्यालाही काही मूठभर शक्तींविरुद्ध समतेसाठी संघर्ष करायचा असल्याचे ते म्हणाले.

तर सौ दुर्गाताई तांबे म्हणाले की, सर्व समाजाला पुढे घेऊन जाणारा पुरोगामी विचार आहे .आमदार बाळासाहेब थोरात व आमच्यावर हेच संस्कार झाले असून आम्ही या विचारांशी कायम कटिबद्ध आहोत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल मंजूर करून महिलांना अधिकार दिला आहे.

तर डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, सर्वधर्मसमभाव ही आपल्या राज्यघटनेची देण आहे. संगमनेर मध्ये 50 जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहे. एक तालुका एक परिवार ही संकल्पना आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राबवली गेली आहे .यापुढेही आपल्याला सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे असून सुवर्ण भारत घडवण्यासाठी सर्व तरुणांनी राज्यघटनेच्या विचारांशी बांधील राहून देशात सुरू असलेली हुकुमशाही रोखण्यासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी केले

तर उत्कर्षाताई रूपवते म्हणाल्या की, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांशी आपण कायम एकनिष्ठ असून या विचारांपासून कधीही बाजूला जाणार नाही असे त्यांनी सांगितले. यावेळी  विचारवंत प्राचार्य हिरालाल पगडाल यांनी देशात सुरू असलेल्या भाजपच्या हुकूमशाही विरुद्ध आवाज उठवताना संविधान रक्षणासाठी सर्वांनी कटिबद्ध राहा असे आवाहन केले. याप्रसंगी प्रा बाबा खरात यांचीही भाषणे झाली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शशिकांत माघाडे यांनी केली सूत्रसंचालन गौतम गायकवाड यांनी केले तर अमित सोनवणे यांनी आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here