वीजेच्या लपंडावामुळे उद्योजक त्रस्त

0
973

संगमनेर औद्योगिक वसाहतीत दिवसातून 8 – 10 वेळा ट्रीपिंग

प्रश्न सुटला नाही तर हाय वे ला रास्तारोको

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये वीजेच्या प्रश्‍नामुळे ग्राहक मेटाकुटीला आले असून दिवसभरात 8 ते 10 वेळा वीज जात आहे. या औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास 150 पेक्षाही अधिक उद्योग असून 5000 कर्मचारी या उद्योगांवर अवलंबून आहेत.
काही उद्योग 24 तास सुरू असतात तर काही उद्योग हे 12 तासाचे आहेत. एकदा जरी वीज गेली तर एका उद्योजकाचे दिवसभरात 15000 ते 20000 चे नुकसान होत आहे. कधी कधी मशीनचे अतिशय महत्त्वाचे स्पेअर पार्टस् खराब होतात. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होते, मटेरियल वेळेत बनत नसल्याने अनेक ग्राहक त्या कंपनीबरोबरचा व्यवसाय बंद करत आहेत. कोव्हीडनंतर कंबरडे मोडलेल्या उद्योजकांचे व्यवसाय हे सुरळीत होण्यासाठी अनेक दिवस लागले. विविध प्रकारचे टॅक्स, ट्रान्सपोर्ट, शासकीय परवानग्या याने आधीच बेजार झालेला उद्योजक वीजेच्या या त्रासामुळे त्रस्त झाले आहेत. अनेक दिवसांपासून उपकरणांची देखभाल केलेली नाही, जी उपकरणे बदलायला हवीत ती उपकरणे बदललेली नाहीत. शनिवारी मेन्टेनन्स च्या नावाखाली दिवसभर वीज नसते. शनिवारी कुठल्याही प्रकारची देखभाल केली जात नसल्याचेही उद्योजकांचे म्हणणे आहे.


संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीने वीज वितरण कंपनीला स्वतःची जागा दिलेली आहे. या जागेत सबस्टेशन उभारले गेलेले आहे. लाखोंची बिले भरणार्‍या या उद्योजकांना सबस्टेशनचा, अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा त्रास होणार असेल तर उद्योजक रस्त्यावर येऊन हाय वे वर रास्तारोको करण्याचे उद्योजकांनी ठरविले आहे. वसाहतीच्या जागेत सबस्टेशन असून याच सबस्टेशनमधून निमोण, मालदाड फीडरला या वीजेचा सप्लाय होतो. या गावांमध्ये वीजेच्या तारा एकमेकांना चिटकल्या किंवा पक्षी चिटकला तरी संगमनेर औद्योगिक वसाहतीमध्ये वीज जाते. या सर्व गोष्टींना उद्योजक वैतागलेले आहेत. अनेक वेळा अधिकार्‍यांकडे पाठपुरावा केला असता गोल गोल उत्तरे मिळतात. मात्र आता काही तोडगा निघाला नाही तर सबस्टेशन वर रास्तारोको करण्याबरोबरच संगमनेरमधील ऑफिसलाही टाळे ठोकू असे उद्योजकांनी ठरविले आहे. उद्योजकांना होणार्‍या त्रासाची व नुकसानीची नोंद विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता व उपअभियंत्यांनी तातडीने घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here