विज वितरण विभागाचा ढिसाळ कारभार
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर -निवडणुकीसाठीचे राजकारण करणारा भाजपा पक्ष आणि सत्तेसाठी काम करणारे शिंदे व पवार गट यांच्यामुळे महाराष्ट्राची मोठी हेळसांड सुरू आहे. सरकारी चुकीच्या धोरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह संगमनेर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात वीज धोरणाचा बट्ट्याबोळ झाला असल्याची टीका उत्तर नगर जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे व असंघटित कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष जयराम ढेरंगे यांनी केली आहे.
संगमनेर शहरात वीज वितरण कंपनीच्या कारभारामुळे भर उन्हाळ्यात नागरिकांना उकडा सोसावा लागत आहे. रात्रीच्या वेळी लाईट जाणे, अपूर्ण दाबाने लाईट मिळणे हे सर्रास झाले आहे. याचबरोबर ग्रामीण भागातही लाईटने मोठा खेळखंडोबा केला आहे. संगमनेर तालुक्याच्या बाबत हा त्रास मुद्दामहून दिला जातो की काय अशी शंका नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून या विभागांमध्ये अत्यंत अपूर्ण कर्मचारी आहेत. तालुक्यात जास्त प्रमाणात जागा रिक्त आहेत त्या जागांवर चुकीच्या लोकांची नेमणूक केली आहे. कर्मचार्यांचे वेळेवर कामावर नसणे, गावोगावी वायरमन हजार नसणे, मुख्य अभियंता यांचा प्रशासनावर नसलेला अंकुश यामुळे सर्वत्र अनागोंदी कारभार सुरू आहे. तरी सरकारने व वीज वितरण विभागाने ऐन उन्हाळ्यामध्ये नागरिकांना त्रास न देता पूर्ण दाबाने वीज पुरवठा करावा. रात्रीच्या वेळी वीज सुरळीत सुरू ठेवावी. याचबरोबर ग्रामीण भागामध्ये सर्व कर्मचारी वेळेत हजर ठेवावे अशी मागणी करण्यात आली असून यामध्ये वेळीच तात्काळ दुरुस्ती न झाल्यास वीज वितरण कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा युवक काँग्रेस व असंघटित कामगार काँग्रेस संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.