
वैदकीय क्षेत्रातील अध्यायाचा अंत
युवावार्ता – संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेरातील प्रसिद्ध डॉक्टर, समाजसेवक, धार्मिक व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले डॉ. किशोर वसंत सराफ यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने वैद्यकीय क्षेत्रासह समाजकार्याच्या एक महत्त्वाच्या अध्यायाचा अंत झाला आहे.
डॉ. सराफ यांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संगमनेरमध्ये पूर्ण करून, पुण्याच्या टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून B.A.M.S. पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून M.A.S.C. (शल्यतंत्र) ही पदवी मिळवली. स्त्रीरोग व प्रसूतीत विशेष नैपुण्य मिळवून, या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय सेवा दिली.
याशिवाय त्यांनी M.B.B.S. व फिजिओथेरपीचे शिक्षणही पूर्ण केले होते. वैद्यकीय शिक्षणाचा प्रचंड अनुभव आणि दृष्टीकोन असलेल्या सराफ सरांनी संगमनेरमध्ये ‘वसंत कुसुम आयुर्वेदिक योग प्रतिष्ठान’ स्थापन केली. या संस्थेमार्फत ‘सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालय’ स्थापन करण्यात आले. या महाविद्यालयात B.A.M.S. च्या शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत पदव्युत्तर शिक्षणाचाही समावेश होता.
रुग्णसेवेच्या क्षेत्रात पुढाकार घेत, त्यांनी 150 खाटांचे आधुनिक आयुर्वेदिक रुग्णालय स्थापन करून गरजूंसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या. याच संस्थेमार्फत फिजिओथेरपी महाविद्यालय सुरू करून त्यांनी वैद्यकीय शिक्षणाचा अजून एक महत्त्वाचा दुवा समाजाला दिला.
डॉ. किशोर सराफ यांची व्यासंगी आणि शिस्तबद्ध वृत्ती त्यांना अनेक आघाड्यांवर नेतृत्व देण्यास पात्र ठरली. त्यांनी पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, CCIM आणि AYUSH या प्रतिष्ठित संस्थांमध्ये उच्च पदांवर कार्य केले.
खेळातही त्यांना विशेष रस होता. बॅडमिंटन व टेबल टेनिस हे त्यांचे आवडते खेळ होते.
त्याच्या पश्चात पत्नी डॉ. जयश्री सराफ, मुले डॉ. चिन्मय व डॉ. नैमिश, सुना डॉ. संपदा व डॉ. ऋता, तसेच भाऊ आर्किटेक्ट संजय सराफ, वहिनी सौ. साधना, पुतण्या डॉ. चैतन्य व स्नुषा डॉ. आदिती असा परिवार आहे.
सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालय व त्याची पुढील वाटचाल हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांचे जीवनकार्य, त्यांची शिकवण, आणि सामाजिक बांधिलकी ही सर्वांनी आठवावी अशीच आहे. दैनिक युवावार्ताच्या वतीने डॉ. किशोरजी सराफ यांना भावपूर्ण श्रध्दांजली !