ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे यांचे निधन

0
7

माजी खासदार, माजी कुलगुरू व ‘लातूर पॅटर्न’चे जनक काळाच्या पडद्याआड

माजी खासदार, माजी कुलगुरू आणि थोर विचारवंत डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे (डॉ. जे. एम. वाघमारे) यांचे आज सकाळी साडेआठ वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनातील एक ज्येष्ठ, अभ्यासू व वैचारिक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

११ नोव्हेंबर १९३४ रोजी जन्मलेल्या डॉ. वाघमारे यांनी आयुष्यभर शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. शिक्षणतज्ज्ञ, साहित्य अभ्यासक आणि राजकारणी म्हणून त्यांनी राज्यात व देशात स्वतंत्र ओळख निर्माण केली. डॉ. वाघमारे हे नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (एसआरटीएमयू) चे संस्थापक व पहिले कुलगुरू होते. विद्यापीठाच्या स्थापनेपासून शैक्षणिक पायाभूत रचना उभारण्यापर्यंत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मराठवाड्यात उच्च शिक्षणाची दारे सर्वसामान्यांसाठी खुली करण्यामागे त्यांचा मोठा वाटा होता.

इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले. निग्रो साहित्य, दलित साहित्य आणि पुरोगामी साहित्य चळवळीवर त्यांनी सखोल अभ्यासपूर्ण लेखन व संशोधन केले. सामाजिक न्याय, समता आणि परिवर्तनवादी विचारसरणी यांवर त्यांनी परखड मांडणी केली. डॉ. वाघमारे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून राज्य सभेवर निवडून गेले होते. राज्यसभेतील कार्यकाळात त्यांनी शिक्षण, सामाजिक न्याय आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर प्रभावी भूमिका मांडली. तसेच लातूर नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.

डॉ. वाघमारे यांच्या पार्थिवावर त्यांचे मूळगाव कवठा, ता. औसा, जि. लातूर येथे उद्या सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिक्षण, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी केलेले भरीव व दूरदृष्टीपूर्ण कार्य समाजासाठी दिशादर्शक ठरले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या वैचारिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शिक्षण क्षेत्रात संपूर्ण भारतभर ओळख असलेल्या ‘लातूर पॅटर्न’चे जनक म्हणून डॉ. वाघमारे सर ओळखले जातात. स्पर्धात्मक व निकालाभिमुख अभ्यासपद्धती, शिस्तबद्ध अध्ययन आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाची संकल्पना त्यांनी लातूरमध्ये रुजवली. आज देशभरात ज्याचा उल्लेख आदराने केला जातो, त्या लातूर पॅटर्नचा प्रारंभीचा पाया डॉ. जे. एम. वाघमारे यांनी घातला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here