तुला दान करत डॉ. विशाल ताम्हाणे यांनी साजरा केला आई-वडिलांच्या लग्नाचा सुवर्ण महाेत्सवी वाढदिवस
संगमनेर (प्रतिनिधी):- श्रीमानयोगी कादंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांनी मातोश्री जिजाऊंची केलेली सुवर्णतुला संकल्पना समोर ठेवत आपल्या आई-वडिलांची तुला करून दान करायचे असे मनाशी ठरवत शहरातील डॉ.विशाल ताम्हाणे यांनी आपल्या आई-वडिलांच्या लग्नाच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने दोघांचीही वही-तुला केली.
या कार्यक्रम प्रसंगी नातेवाईक,आप्तेष्ट व मित्रपरिवार उपस्थित होता. या निमित्ताने डॉ.ताम्हाणे यांनी आई-वडिलांचे सपत्नीक पाद्यपूजन केले. सुरुवातीला वडिल सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंत ताम्हाणे यांची वही-तुला करण्यात आली.नंतर आई शोभा ताम्हाणे यांची वही-तुला करण्यात आली.सोबतच अन्नदान म्हणून दोन धान्याचे कट्टे व किराणा साहित्यही तुलेमध्ये टाकण्यात आली. या वही-तुलामधील सर्व वस्तू निराधारांच्या शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या आधार फौंडेशनला दान करण्यात आल्या.आधारचे समन्वयक सोमनाथ मदने व लक्ष्मण कोते यांनी या साहित्यांचा स्वीकार आधारच्यावतीने केला.
तुला-दान एक स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन सह्याद्री संस्थेचे रजिस्ट्रार बी.आर.गवांदे यांनी केले.अशाच प्रकारे मातृ-पितृ जनांचा अभिष्टचिंतन सोहळा मुलांनी करून सामाजिक बांधिलकी जपता येईल,असे मनोगत संज्योत वैद्य यांनी व्यक्त केले.