ग्रामस्थांमुळे पठार भागातील डिझेल चोरीचा पर्दाफाश

1
574

युवावार्ता (प्रतिनिधी)
घारगाव- संगमनेर तालुक्यातील पठारभागात नाशिक -पुणे महामार्गावर रात्रीच्यावेळी ढाब्यांवर उभ्या राहणार्‍या चारचाकी वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर डिझेल चोरीच्या घटना घडत होत्या. याबाबत अनेक तक्रारी घारगाव पोलिसांत दाखल होत असताना हे डीझेल चोर मोकाट होते. दरम्यान सोमवारी पहाटे नांदुर खंदरमाळ शिवारातून एका स्थानिक वाहनातील डिझेलची चोरी झाल्याची घटना घडली. त्यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी पोलिसांवर दबाव वाढवित कसून चौकशीची मागणी केली. तसेच एक संशयीताचे नाव देखील सांगितले. त्यामुळे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला आणि डिझेल चोरीचे रहस्य उघड झाले. घारगाव पोलिसांनी डिझेल चोरी व त्याची साठवणूक करणार्‍या चंद्रकांत उर्फ साईनाथ गणेश शेळके याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास याला अटक केली आहे.


याबाबत माहिती अशी की, खंदरमाळ येथे राहणारे प्रवीण लेंडे हे आपल्या मालकीच्या मालट्रकमध्ये (क्र.एम.एच.17/सी.व्ही.2712) पशूखाद्य घेवून घारगावला आले. येताना त्यांनी आपल्या वाहनात 165 लिटर डिझेलही भरले होते. आपली गाडी खाली करून नेहमीप्रमाणे खंदरमाळ येथील मित्रांच्या घरासमोर गाडी लावून ते घरी गेले. दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांच्या एका नातलगाने तुमच्या गाडीच्या डिझेल टाकीचे झाकण उघडे असल्याची माहिती प्रवीण लेंडे यांना दिली. लेंडे यांनी येवून आपले वाहन तपासले डिझेलची भरलेली टाकी पूर्णतः रिकामी झाल्याचे दिसले. सदरील घटना समजताच अनेक गावकर्‍यांनी लेंडे यांच्यासह घारगाव पोलीस ठाणे गाठले. त्यांनी डिझेल चोरीची माहिती देत एका संशयीताची माहिती पोलिसांना दिली. सुरुवातीला आडेवेढे घेणार्‍या पोलिसांनी ग्रामस्थांसह जावून बंद असलेल्या दुकानाचे शटर तोडून आंत घुसले. आतमध्ये सुमारे दोन हजार लिटर क्षमतेच्या टाकिसह अनेक छोटे-मोठे ड्रम डिझेलने भरलेले आढळून आले. पोलिसांनी दुकानातील सर्व मुद्देमाल ताब्यात घेत दुकान मालकाला शोधून ताब्यात घेतले. या प्रकरणी प्रवीण लेंडे यांच्या फिर्यादीवरुन खंदरमाळ येथील चंद्रकांत उर्फ साईनाथ गणेश शेळके (वय 25) याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. दिवसांपासून पठार भागातील ढाब्यांवर रात्रीच्यावेळी मुक्कामी थांबणार्‍या मालवाहूक वाहनांमधील डिझेल चोरीला आळा बसण्याची शक्यता आहे.

1 COMMENT

  1. चोरांची सर्व माहिती पोलिसांना असते.पण जो पर्यंत चोर पोलिसांना खुष ठेवतात. तो पर्यत चालु राहते.हे एक तर हप्ते बंद झाले किंवा जनतेचा उठाव झाला की काही काळ बंद राहते.कारण यात काही राजकारण व आर्थिक तडजोड असतात. अशी माझी माहिती आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here